पुणे : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांकडून पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. आता या मागणीसाठी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संयुक्त संघटना ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान संपाची हाक दिली आहे. यामुळे बँका सोमवार ते बुधवार बंद राहणार असून, त्याचा परिणाम धनादेशांसह इतर बँकिंग व्यवहारांवर होणार आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे धनादेश वटविण्यासह प्रत्यक्ष बँकेच्या शाखेतून दिल्या जाणाऱ्या ‘रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट’ (आरटीजीएस) सेवेवर परिणाम होणार आहे. एखाद्या ग्राहकाने धनादेश बँकेत अथवा एटीएममध्ये जमा केल्यानंतर त्यावर तीन दिवस प्रक्रिया होऊ शकणार नाही. याचा फटका प्रामुख्याने धनादेशाद्वारे व्यवहार करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांना बसणार आहे. याचबरोबर या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील मोठी रोकडही बँकेत जमा करता येणार नाही. ‘आरटीजीएस’द्वारे व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांनाही या संपाचा फटका बसणार आहे. याचबरोबर महिनाअखेरीस हा संप असल्याने नोकरदारांचे वेतन मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

विविध ठिकाणी निदर्शने

या संपाविषयी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’चे सहसमन्वयक शिरीष राणे म्हणाले की, पुण्यात २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान विविध ठिकाणी शांततापूर्ण निदर्शन केली जाणार आहे. संपाच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील स्टेट बँकेच्या शाखेसमोर निदर्शने केली जाणार आहेत. याचबरोबर याच शाखेसमोर बुधवारी सकाळी १० वाजता निदर्शने केली जाणार आहेत. या निदर्शनांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या संपाच्या माध्यमातून शांततापूर्ण पद्धतीने बँक कर्मचारी आपली ताकद सरकारला दाखवून देतील.

अडीच वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित

याबाबत ‘बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन’चे अध्यक्ष राजीव ताम्हणे म्हणाले की, बँक कर्मचारी प्रदीर्घ काळापासून पाच दिवसांच्या आठवड्यांची मागणी करीत आहेत. इंडियन बँक्स असोसिएशन आणि कर्मचारी-अधिकारी संघटनांमध्ये याबाबत ८ मार्च २०२४ रोजी सहमती झाली. सोमवार ते शुक्रवार कामकाजाच्या वेळेत आवश्यक वाढ करून ही व्यवस्था लागू करण्याचा प्रस्तावही सरकारकडे पाठविण्यात आला. मात्र, अडीच वर्षांहून अधिक काळ त्यावर निर्णय झालेला नाही. यामुळे अखेर बँक कर्मचाऱ्यांना संपाचा निर्णय घ्यावा लागलेला आहे.