पुणे मेट्रो प्रकल्पाचा जो आराखडा यापूर्वी मंजूर झाला आहे त्या आराखडय़ानुसारच मेट्रो प्रकल्प होईल, अशी ठाम भूमिका अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी मांडली. मेट्रोसाठी दीर्घकालीन विचार करण्याबरोबरच आर्थिक गणितांचाही विचार करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पूर्वी जे ठरले आहे तशाच पद्धतीने मेट्रो प्रकल्प होईल, असेही ते म्हणाले. मेट्रोबाबत गेला आठवडाभर शहरात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाबाबत गेल्या आठवडय़ात केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत बैठक घेतली होती. या बैठकीत पुणे मेट्रोबाबत सर्व संबंधितांची बैठक या महिनाअखेर पुण्यात बोलवावी व सर्वाची मते जाणून घ्यावीत असा निर्णय घेण्यात आला. पुणे मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारपुढे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आलेला असताना या बैठकीमुळे मेट्रो प्रकल्पाला विलंब होणार असल्याची टीका सर्व पक्षांनी केली आहे. तसेच, आहे तोच प्रकल्प मंजूर झाला पाहिजे, असाही आग्रह धरण्यात येत आहे.
कॅबिनेटमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना जो आराखडा यापूर्वी मंजूर झाला आहे त्याच आराखडय़ानुसार मेट्रो होईल, अशी भूमिका घेतली. पुण्याची मेट्रो भुयारी असावी ही खासदार अनिल शिरोळे यांची पूर्वीपासूनचीच भूमिका आहे. या प्रकल्पाचा दीर्घकालीन विचार करता ती भूमिका सयुक्तिकही असू शकते. मात्र प्रकल्पाचा विचार करताना खर्चाचाही विचार करणे व आर्थिक गणित जुळवणे महत्त्वाचे ठरते. पुणे मेट्रोचा प्रकल्प पुढे गेला असून नागपूरच्या हिवाळी अधिवेशन सुरू असताना त्यासंबंधीची बैठक होणार आहे. सद्य:परिस्थितीत पूर्वी ठरल्याप्रमाणेच मेट्रो होईल, असे बापट म्हणाले.