बारामती : निरा-मोरगाव मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या १० वर्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन भावंडे मृत्युमुखी पडल्याने फलटणमधील मुरुम गाव परिसरात शोककळा पसरली आहे.

गेल्या शनिवारी सेजल (वय १७) आणि अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (वय १५, रा. मुरुम, फलटण) या दोघींचा मृत्यू झाला. त्यांचा भाऊ पवन (वय १०) हा जखमी झाला होता. सुरुवातीला त्याच्यावर बारामती येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेजण मामाच्या गावी जाण्यासाठी मोपेडवरून निघाले होते. चौधरवाडी फाट्याजवळ मोपेड आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन सेजल आणि अक्षरा यांचा जागीच मृत्यू झाला, तर पवन गंभीर जखमी झाला होता. रविवारी सेजल आणि अक्षरा यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पवनच्या निधन झाल्याने या परिसरात शोककळा पसरली.