पुणे : बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून, मतदारांमध्ये निरुत्साह आहे. पहिल्या दोन तासांमध्ये अवघ्या ८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार आहेत.
मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांमध्ये ८ टक्के मतदारांनी मतदान केले.या मतदारसंघात तीन लाख ८४ हजार ५७९ मतदार आहेत. त्यापैकी पहिल्या दोन तासांमध्ये ३० हजार ७९८ मतदारांनी मतदान केले.
गेल्या निवडणुकीत ७१.८६ टक्के मतदान
बारामतीत २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ७१.८६ टक्के मतदान झाले होते. त्या निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्यात लढत झाली होती. त्यामध्ये अजित पवार यांनी एक लाख ६५ हजाराच्या मताधिक्याने विजय साकारला होता.
बारामतीत १९९१ मध्ये सर्वाधिक मतदान
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीमधून पहिल्यांदा १९९१ मध्ये निवडणुकीला उभे राहिले. तेव्हा बारामतीकरांनी विक्रमी मतदान केले. तेव्हा ८१.८५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ८१.२४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये सरासरी ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे.
