पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला होता. त्यामुळे निवडणूक झालीच, तर त्यांच्या प्रचारासाठी बारामतीला जाणार आहे, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही निवडणूक लढण्याचा आग्रह सोडण्याबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना तशा सूचना द्याव्या, असेही त्यांनी नमूद केले.

रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी आणि प्रमुख नेत्यांची बैठक येथे पार पडली. या बैठकीला राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरोदे, प्रदेश सरचिटणीस अविनाश महातेकर, गौतम सोनावणे, प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस आशा लांडगे, बाळसाहेब जानराव, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, संजय सोनवणे या वेळी मान्यवर उपस्थित होते.

बारामती येथी पोटनिवडणुकीबाबत आठवले म्हणाले, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. अजित पवार यांच्यासारखा मोठा नेता राज्याने गमावला आहे. त्यांच्या अपघात प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, ही चौकशी सीबीआयकडे देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र दिले आहे. पोटनिवडणुकीबाबत सुनेत्रा पवार यांच्याशी बोलणे झाले. मात्र, निवडणूक झाल्यास त्यांच्या प्रचाराला जाणार आहे. तसेच आमचे कार्यकर्ते ही प्रचार करतील.

विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या दमनशाहीचा पराभव करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण पाठिंबा राहील. बंगालमध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवार उभा करणार नाही. तर तामिळनाडूमध्ये ४०, तर आसाममध्ये ४ उमेदवार रिंगणार असतील. पुदुच्चेरी येथे भाजप, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला जाणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

लोकसभेत महिलांसाठी २७३ जागा वाढवण्याबाबत आता विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यात महिलांबाबतचे विधेयक मांडले जाणार आहे. त्यामुळे महिलांच्या जागांमध्ये वाढ होऊन त्या ८१६ होणार आहेत. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना वेगळे आरक्षण असणार आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली.

महिलांसाठी आरक्षित असलेल्या राखीव जागांचा लाभ इतर मागास प्रवर्ग, भटके विमुक्त प्रवर्गातील महिलांना मिळणार नाही. कारण या प्रवर्गांना अद्याप राजकीय आरक्षण दिले गेलेले नाही. मात्र, अनुसूचित जाती, जमातींप्रमाणेच इतर मागासवर्गीय आणि भटके विमुक्त यांनाही राजकीय आरक्षण मिळावे, अशी भूमिका असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

पावसाळी अधिवेशनापूर्वी विविध महामंडळांवरील अध्यक्ष, सदस्यांच्या नियुक्त्या करण्याची मागणी आठवले यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘रिपब्लिकन’ला विधान परिषदेतील एक जागा, प्रत्येक जिल्ह्यात महामंडळाचे किमान एक सदस्यत्व आणि काही महामंडळांवर अध्यक्ष पद देण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

चवदार तळे आंदोलन शताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे आंदोलनाच्या शताब्दी वर्षानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार राज्यव्यापी समता परिवर्तन यात्रा १४ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई यांचे स्मारक असलेल्या सातारा येथून केला जाणार आहे, तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाचे औचित्याने १० नोव्हेंबर रोजी पुणे येथे करण्यात येणार आहे.

तसेच राज्यातील प्रत्येक विभागात सामाजिक समता परिषदा, समतावादी विचारवंत आणि साहित्यिक यांचे संमेलन, १५ ऑक्टोबरला कोल्हापूर येथे बौद्ध धम्म परिषद, आंबेडकरी चळवळीतील शाहीर कलावंतांच्या स्पर्धा, क्रीडा स्पर्धा असे अनेक उपक्रम राबवण्यात येणरा असल्याची माहिती आठवले यांनी दिली.