पुणे : बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली असली, तरी कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. काँग्रेसच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्यात येणार असून, ‘संघटन सृजन’ अभियानातून राज्यात साडेसात हजार नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी माजी आमदार मोहन जोशी आणि रमेश बागवे, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महापालिकेतील गटनेते चंदू कदम आदी उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले, ‘बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. मात्र, काँग्रेसने कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. महायुतीला पाठिंबा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या दूरध्वनीवरूनही हा निर्णय घेतलेला नाही. आम्ही सभ्यतेचा भाग म्हणून निवडणुकीत माघार घेतली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी याबाबतचा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार हा निर्णय घेतला आहे. बारामतीतील कार्यकर्त्यांशी चर्चा केली असून, हा निर्णय सर्वांच्या सहमतीने झाला आहे.’
‘अजित पवार यांच्या घातपाताच्या संशयाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा गुन्हा राज्याकडे पाठविण्यात आहे. मात्र, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही करताना दिसत नाहीत. ते काहीही बोलायला तयार नाहीत. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग काहीही करायला तयार नाही. ही संतापजनक बाब आहे,’ असेही सपकाळ म्हणाले.
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सपकाळ म्हणाले की, ‘ राणे यांना मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपद वगळता काँग्रेस पक्षाने सर्व काही दिले. त्यांना शिवसेनेपेक्षा जास्त काळ काँग्रेसने सत्ता दिली.’
‘काँग्रेस पक्षात ‘संघटन सृजन’ अभियानातून मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्यात साडेसात हजार नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामध्ये बहुतांश नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रमही सुरू आहेत.’
पुण्यात दोन शहराध्यक्ष नेमण्याची ही संघटनात्मक बाब आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोग हा एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे वागत आहे. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये आयोगाचे काम पाहता ‘मत चोरी’चा मुद्दा पुन्हा एकदा निदर्शनास आणून देणार आहोत.’ असे सपकाळ यांनी नमूद केले.
‘वारकरी संप्रदाय हा पुरोगामी विचारांचा वारसा असणारा आहे. मात्र, सध्या वारकरी संप्रदायाच्या आड राहून काही लोक प्रतिगामी विचार मांडत आहेत. राष्ट्र्रीय स्वयंसेवक संंघाची विचारधारा ही स्त्री-पुरुष असमानता आणि जातिवाद मानणारी आहे,’ अशी टीका सपकाळ यांनी केली.
