बारामती : बारामती शहरात हॉटेलमधील बिलावरून झालेल्या वादात चार जणांनी सळई आणि कुऱ्हाडीने वार केल्याने जखमी झालेल्या तरुणाला पोलिसांनी वेळीच मदत केल्याने जीवदान मिळाले.
महेंद्र धोंडिबा गायकवाड (वय ५३) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. मोरगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये बील देण्यावरून गायकवाड आणि चार तरुणांमध्ये वाद झाला. त्यावेळी चौघांनी कुऱ्हाडी आणि लोखंडी सळईने गायकवाड याच्यावर वार केले. भांडण सुरू असताना आजूबाजूचे नागरिक मध्यस्थी करण्यास आले असता, एका आरोपींने ‘कोणी येऊ नका, नाहीतर बघून घेऊ’ अशी धमकी दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला बारामती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. वेळीच उपचारांमुळे जखमीला जीवदान मिळाले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, अन्य दोनजण पसार झाले आहेत. बारामती शहर पोलीस तपास करत आहेत.
