बारामती: तालुक्यातील शेरेवाडी येथे चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन ज्येष्ठ महिलांचा मृत्यू झाला. महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून चोरटे फरार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. कृष्णाबाई लडकत (वय ६५) आणि इंदुमती लडकत (वय ७५ ) अशी खून झालेल्या ज्येष्ठ महिलांची नावे आहेत. चोरीच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही ज्येष्ठ महिला घरच्या पडवीत रात्री झोपलेल्या होत्या. चोरट्यांनी लोखंडी सेफ्टी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघीही जाग्या झाल्या. त्यांनी विरोध केला असताना चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघींच्या अंगावरील दागिने चोरून चोरटे पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, न्यायवैद्यक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून पुरावे संकलित करण्यात आले. ‘हल्लेखोरांनी घरात प्रवेश कसा केला, महिलांना लक्ष्य करण्यामागे नेमके कारण काय आणि या घटनेत आणखी कोणी सहभागी आहे का, या दिशेने तपास सुरू आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता का, महिलांना आरोपी ओळखत होते का, यादृष्टीनेही तपास करण्यात येत आहे. तपासासाठी पथके तयार करण्यात आली आहेत,’ असे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितले.
हा प्रकार चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चोरट्यांनी महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरले आहेत. ओळख पटू नये म्हणून हल्ला करण्यात आला का, यासह सर्व शक्यता तपासण्यात येत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. संदीप सिंह गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
