बारामती : बारामती शहर आणि परिसरात काल मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संततधारेमुळे आतापर्यंत १५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने शहरातील सखल भाग जलमय झाले असून, अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः चारा पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, बागायती पट्ट्यात काढणीला आलेल्या तरकारी पिकांना या पावसाचा फटका बसला आहे.
शेतांमध्ये पाणी साचल्याने भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, काढणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही पिकांना पावसाचा फायदा झाला असला, तरी काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पावसामुळे चारा पिकांना जीवदान मिळाले असून, दुसरीकडे तरकारी उत्पादकांना नुकसानीची चिंता सतावत आहे. शहरात सखल भागांमध्ये पाणी साचल्याने पावसाळी पाणी निचऱ्याचा प्रश्नही पुन्हा चर्चेत आला आहे.
बारामतीमध्ये काल रात्री मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. अवघ्या एका रात्रीत १५८ मिमी पाऊस झाल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. युगेंद्र पवार, युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )
नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
बारामती शहरासह तालुक्यातील काही भागांत आज पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली. बारामती शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही सखल भागांत, विशेषतः भिगवण रोड परिसरात पाणी साचले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पावसाचा आणि सद्य:स्थितीचा आढावा घेतला. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
शहरातील भिगवण रोडसह ज्या भागांत पाणी साचले आहे, त्या ठिकाणी तातडीने पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी. पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर आणून जनजीवन सुरळीत सुरू राहील, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे. आवश्यक ती आपत्कालीन यंत्रणा आणि मनुष्यबळ सज्ज ठेवावे. शहरासह तालुक्यातील पावसाच्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक ग्रामस्थांना, नागरिकांना तसेच प्रवाशांना त्रास होता कामा नये. त्यांच्या सुरक्षिततेला आणि जनजीवन सुरळीत ठेवण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.
बारामती शहर आणि तालुक्यात पावसामुळे झालेल्या संभाव्य नुकसानीची संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी. आवश्यक त्या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. परिस्थितीवर प्रशासनाने बारकाईने लक्ष ठेवून नागरिकांना तातडीने दिलासा मिळेल, अशा पद्धतीने कार्यवाही करावी, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
