बारामती: बारामती पंचायत ‘समिती’च्या सभापतिपदी किरण रावसाहेब तावरे यांची, तर उपसभापतिपदी गुणवडी पंचायत समिती गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची बिनविरोध निवड झाली. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतील या पंचायत समितीतील सभापती आणि उपसभापती या पदांच्या निवडीबाबत राजकीय क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तावरे आणि आगवणे यांची निवड केली.
तावरे हे पणदरे गटातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे संघटनकौशल्य आणि सामाजिक कामातील सक्रिय सहभाग पाहून त्याच्याकडे सभापतिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या पत्नी मीनाक्षी तावरे या जिल्हा परिषद सदस्या होत्या. सभापतिपदी निवड झाल्यानंतर तावरे म्हणाले, ‘पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासाला प्राधान्य देणार आहे. शेतकरी, महिला आणि युवकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर असणार आहे.’
