बारामती : बारामती शहर व तालुका परिसरात बुलेटसह दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १३ बुलेटसह १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरीच्या वाहनांवर त्याने महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र वनसेवा आणि एसटी महामंडळाचे बोधचिन्ह लावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.
समाधान बाळू काळे (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत सुमारे ३० लाख रुपये आहे. पोलीस चौकशीत बारामती शहर आणि तालुका पोलीस ठाण्यातील १९ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बुलेट चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे वाहनचोरांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांची स्वतंत्र पथके तयार केली होती. संशयित व्यक्ती व वाहनांवर लक्ष ठेवण्यासह रात्रीची गस्त वाढविण्यात आली होती.
चोरीची मोटारसायकल घेऊन एक संशयित मेडिकल कॉलेज परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा लावला. पेन्सिल चौकाकडून मेडिकल कॉलेजच्या दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या सकाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने रात्रीच्या वेळी बुलेटसह अन्य दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीने चोरीच्या वाहनांवर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र वनसेवा आणि एसटी महामंडळाचे बोधचिन्ह लावून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. त्याने आणखी किती वाहने चोरली आहेत, चोरीच्या वाहनांची विल्हेवाट कशी लावली, याचा तपास करण्यात येत आहे. बारामती तालुका पोलीस करीत आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
