बारामती : बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्व २१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळविले. बंडखोरी केलेले कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा दारुण पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पॅनेलही निष्प्रभ ठरले. या निकालाने बारामतीकरांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी सहानुभूती दाखवत बंडखोर आणि भाजपचे मनसुबे धुळीस मिळविले.
या कारखान्याच्या निवडणुकीसाठी ८४.२५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २१ जागांसाठी तीन पॅनलचे ८३ उमेदवार रिंगणात होते. या कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’ समोरासमोर उभ्या राहिल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’ होते. त्याचे नेतृत्व युवानेते युगेंद्र पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल’चा प्रचार आणि नियोजनाची धुरा युवा नेते जय पवार यांनी सांभाळली. भाजपने ‘राष्ट्रवादी’त फूट पाडून कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर गटाचा पाठिंबा घेत ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पॅनेल आणि बंडखोरांचा निभाव लागला नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारांनी आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत सर्व जागांवर ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल’चे उमेदवार विजयी झाले.
पुरुषोत्तम जगताप यांचा ६४९० मतांनी पराभव
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप यांनी मुरुम-वाल्हा गटातून निवडणूक लढविली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून विक्रम भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून राजेंद्रकुमार जगताप हे उमेदवार होते. विक्रम भोसले यांनी पुरुषोत्तम जगताप यांचा ६४९० मतांनी पराभव झाला. भोसले यांना १३ हजार ८५४ मते मिळाली, तर पुरुषोत्तम जगताप यांना ७३६४ मते मिळू शकली.
दरम्यान, बारामती आणि पुरंदर तालुक्यांसह सातारा जिल्ह्यातील खंडाळा आणि फलटण तालुक्यांपर्यंत या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. सर्व तालुक्यांतून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला प्रतिसाद मिळाला आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याला हा विजय समर्पित. हा विजय केवळ आनंदाचा क्षण नसून, सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची मोठी जबाबदारी आहे. सभासद शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करून कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणे, हेच ध्येय राहील. – सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
गट आणि विजयी उमेदवार
निंबूत-खंडाळा गट क्र. १
अभिजित सतीश काकडे
प्रमोद भगवानराव काकडे
वसंतराव रामराव दगडे
मुरुम-वाल्हा गट क्र. २
विक्रम आनंदराव भोसले
ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड
राजवर्धन शिवाजीराव शिंदे
होळ-मोरगाव गट क्र. ३
रवींद्र जयवंतराव भापकर
मकरंद चंद्रकांत सस्ते
मनिषा आनंदकुमार होळकर
कोऱहाळे-सुपा गट क्र. ४
राजेंद्र हरीभाऊ बोरकर
अक्षय धनंजय खलाटे
सुनील नारायण भगत
मांडकी-जवळार्जून गट क्र. ५
सतीश संपत जगताप
सुधाकर ज्ञानोबा टेकवडे
उत्तम महादेव धुमाळ
महिला प्रवर्ग
प्रणिता मनोज खोमणे
छबुबाई अंकुश नाझीरकर
इतर मागास प्रवर्ग
शैलेश पंढरीनाथ रासकर
भटक्या जाती-विमुक्त जमाती प्रवर्ग
अशोक चंद्रकांत धायगुडे
अनुसुचित जाती-जमाती प्रवर्ग – द्वारकोजी गुलाब साळवे
ब वर्ग प्रतिनिधी – संग्राम तानाजी सोरटे
