बारामती: बारामती तालुक्यात सध्या १२ गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असून, ‘शेतीसाठी नव्हे, आधी पिण्यासाठी पाणी द्या,’ अशी संतप्त भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. सध्या तालुक्यात ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, १२ गावे आणि ६७ वाड्या-वस्त्यांतील १७ हजार ७७५ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. बारामती तालुक्यातील अंजनगाव, थोपटेवाडी, गाडीखेल, देऊळगाव रसाळ, सोनवडी सुपे, कारखेल, सावळ, जैनकवाडी, मोराळवाडी, गोजुबावी, जळगाव सुपे, जराडवाडी (बनवाडी) या बारा गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

लोकसंख्या वाढत चालली आहे. मात्र, पाणीपुरवठा हा जुन्या लोकसंख्येच्या आधारे करण्यात येतो. त्यासाठी सुधारित लोकसंख्येची माहिती घेऊन त्यानुसार पाणीपुरवठा करावा. – सुरेंद्र गायकवाड, नागरिक

आम्हाला राजकारण नको आहे. आमच्या घरात पाणी द्या. दर वर्षी उन्हाळा आला की टँकरच्या भरवशावर जगण्याची वेळ येते. महिलांच्या डोक्यावरचे हंडे आणि रिकाम्या विहिरी हेच प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांचे वास्तव चित्र आहे. – शेवंता तावरे, नागरिक