पुणे : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने थंडीत अल्पकाळातील अडथळा निर्माण झाला आहे. राज्यात काही प्रमाणात गारवा असला, तरी रात्रीचे किमान तापमान अद्यापही सरासरीच्या पुढे आहे. ९ आणि १० डिसेंबरला तुरळक भागांत पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा सर्वत्र कोरडे हवामान होणार असल्याने तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे डिसेंबरच्या सुरुवातीलाच राज्यात पावसाळी वातावरण होते. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. या काळात दिवसाच्या कमाल तापमानात घट होऊन दिवसा गारवा जाणवत होता. रात्रीचे किमान तापमान मात्र सरासरीच्या तुलनेत ५ ते ८ अंशांनी वाढल्याने अपेक्षित असलेली थंडी जाणवली नाही. दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होऊन काही प्रमाणात गारवा जाणवतो आहे. मात्र, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पावसाची शक्यता आहे. त्याचा परिणाम पुढील दोन दिवस राज्यावर होणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

हवामान…

उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू झाल्यामुळे दिवसा आणि विशेषत: संध्याकाळच्या सुमारास काही प्रमाणात गारवा जाणवतो आहे. त्यामुळे दिवसाचे कमाल तापमान राज्यभर सरासरीच्या खाली आहे. रात्रीचे किमान तापमान मात्र सर्वच ठिकाणी सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंशांनी अधिक आहे.