पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) उपकेंद्र आता छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात येणार आहे. दहा एकर जागेत या उपकेंद्राच्या बांधकामासाठी राज्य सरकारने मान्यता दिली असून, सुमारे २३८ कोटी ११ लाख रुपयांचा खर्ज मंजूर करण्यात आला आहे. या उपकेंद्रात असलेल्या एक हजार उमेदवारांच्या निवास, प्रशिक्षणासाठी सुविधा विकसित केली जाणार असल्याने मराठवाड्यातील उमेदवारांची मोठी सोय होणार आहे.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. सन २०११ साली केलेल्या जनगणनेनुसार राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या जिल्ह्यांत अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘बार्टी’चे मुख्यालय पुण्यात झाले. या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारची प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती अशा विविध योजना राबवण्यात येतात.

राज्यातील विविध भागांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या विभागाच्या अंतर्गत असलेल्या योजनांचा लाभ मिळण्याच्या उद्देशाने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर येथे सहा प्रशिक्षण केंद्रे उभारण्यास राज्य सरकारने २९ जानेवारी २००९ रोजी मान्यता दिली होती. मात्र, प्रशासकीय अडचणीमुळे ही प्रशिक्षण केंद्रे चालू करता आली नाहीत. त्यानंतर ही प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यासाठी ‘बार्टी’मार्फत जागा खरेदी करून त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे चालू करण्यासाठी इमारतीचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता छत्रपती संभाजीनगर (नक्षत्रवाडी ) येथील दहा एकर जागेत ‘बार्टी’चे उपकेंद्र बांधण्यात येणार आहे. उपकेंद्राच्या उभारणीसाठी २३८ कोटी ११ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

उपकेंद्राबाबत बार्टीचे महासंचालक सुनील वारे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर येथे काही वर्षांपूर्वी बार्टीच्या उपकेंद्रासाठी जागा घेऊन ठेवण्यात आली होती. आता या उपकेंद्राच्या बांधकामास मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तावित उपकेंद्रामध्ये प्रशिक्षण केंद्र चालवले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वसतिगृह, ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा अशा सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. पाचशे मुले, पाचशे मुली अशा एकूण एक हजार विद्यार्थ्यांची सोय या केंद्रात केली जाणार आहे. या उपकेंद्राचे बांधकाम पूर्ण होण्यास सुमारे दोन वर्षे लागतील.

बार्टीचे पहिलेच उपकेंद्र

बार्टीचे पुण्यात मुख्यालय असले, तरी पुण्यातही विद्यार्थ्यांसाठी निवासी केंद्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील उपकेंद्र हे निवासी प्रशिक्षण सुविधा असणारे बार्टीचे पहिलेच उपकेंद्र ठरणार आहे, असेही वारे यांनी सांगितले.