मेळघाटातील बांधवांना सक्षम करण्यासाठी जे अनेकविध उपक्रम राबवले जात आहेत, त्यात नव्याने सुरू झालेला स्नानगृहांच्या उभारणीचा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला असून या उपक्रमाचा लाभ मेळघाटातील शेकडो कुटुंबांना होणार आहे. पुण्यातील एका कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून केलेले आर्थिक साहाय्य आणि त्याला स्थानिक कुटुंबांच्या मदतीची जोड यातून पाडय़ापाडय़ांवर स्नानगृह उभारणी शक्य झाली आहे.
मेळघाटात सुनील आणि निरुपमा देशपांडे हे दाम्पत्य ‘संपूर्ण बांबू केंद्र’ या संस्थेच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षे काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठीही बचतगट आणि अनेकविध उपक्रम चालवले जात आहेत. या भागातील पाडय़ापाडय़ांवर स्नानगृह नसल्याची उणीव सुनील देशपांडे यांना जाणवली आणि त्यातून संस्थेतर्फे स्नानगृह बांधणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याला स्थानिक रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यातील अॅटलास कॉप्को या कंपनीने उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी- सीएसआर) या संकल्पनेअंतर्गत या उपक्रमाला पंधरा लाख रुपयांचा निधी दिला असून त्यातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
धारणी तालुक्यातील लवादा येथे संपूर्ण बांबू केंद्राचे काम चालते. केंद्राच्या परिसरात राहणाऱ्या दोन-तीन कुटुंबांना प्रथम बांबूचे स्नानगृह बांधून देण्यात आले. ही संकल्पना गावातील सर्वासाठी नवी होती. स्नानगृहाची उपयुक्तता लक्षात आल्यानंतर या उपक्रमाला स्थानिक रहिवाशांची साथ मिळाली. उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात चित्री या गावात आणि या गावाच्या आसपास असलेल्या काही छोटय़ा गावांमध्ये मिळून शंभर स्नानगृह बांधून दिली जाणार आहेत. बांबूचे छप्पर तसेच स्नानगृहाचा सांगाडा याची बांधणी संपूर्ण बांबू केंद्रात केली जाते. ज्या कुटुंबाला स्नानगृह बांधून दिले जाणार आहे, त्या कुटुंबाने श्रमदानाने स्नानगृहाचा जोता तयार करणे अपेक्षित आहे. त्यासाठीचे साहित्यही संस्थेतर्फेच दिले जाते. स्थानिक कुटुंबांच्या सहभागातूनच हा उपक्रम राबवला जात असल्याचे पुण्यातील मेळघाट सपोर्ट ग्रुपचे मिलिंद लिमये यांनी दिली.