scorecardresearch

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू, अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठ, तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. मंगळवारी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे.

Kasba Chinchwad by elections
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू (लोकसत्ता ग्राफिक्स)

पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (३१ जानेवारी) सुरू होणार आहे. प्रमुख पक्षांनी अद्याप या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित केलेला नाही.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठ, तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. मंगळवारी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. प्राप्त उमेदवार अर्जांची छाननी ८ फेब्रुवारीला होणार आहे. १० फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर २६ फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे.

हेही वाचा – पुरंदर विमानतळग्रस्तांना रोजगाराची संधी, खास संकेतस्थळाची निर्मिती

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड : टायर्सच्या गोडाऊनला भीषण आग; शेजारील रुग्णालयातील रुग्णांना इतरत्र हलवले

दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे शहर प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख हे काम पाहणार आहेत. गणेश कला क्रीडा मंच येथे उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत, तर चिंचवड विधानसभेसाठी थेरगाव येथील ग-क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या ठिकाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त सचिन ढोले यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 10:23 IST