एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना चोरट्यांनी ‘लक्ष्य’ केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांना मदतीचा बहाणा करून चोरट्यांनी त्यांची फसवणूक केल्याचे प्रकार शहरात वाढीस लागले आहेत. निवृत्तिवेतनाची रक्कम चोरटे लंपास करत असल्याने आता ज्येष्ठांनी बतावणी करणाऱ्या चोरट्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.

एटीएम केंद्राच्या परिसरात चोरटे पाळत ठेवून फसवणुकीचे गुन्हे करत आहेत. चोरटे एटीएममध्ये जाणाऱ्या ज्येष्ठांवर नजर ठेवतात. गजबजलेल्या भागातील एटीएम केंद्रातही चोरट्यांनी ज्येष्ठांची फसवणूक केली आहे. शहरात अशा प्रकारच्या घटना गेल्या पाच-सहा महिन्यांपासून वाढीस लागल्या आहेत. मध्यंतरी शहराच्या मध्य भागात ‘एटीएम’मधून पैसे काढणाऱ्या चार ते पाच ज्येष्ठांची फसवणूक करण्याचे प्रकार घडले होते. सदाशिव पेठ, नवी पेठ भागात अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. विश्रामबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे कर्नाटकातील एका चोरट्याला पकडले. त्याच्याकडून बाद झालेली एटीएम कार्ड जप्त केली होती. चोरट्याने मैत्रिणीवर खर्च करण्यासाठी एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांची फसवणूक केली होती. पुण्यातील मध्य भागासह पिंपरी-चिंचवड शहरातही चोरट्यांनी आठ ते दहा गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले होते. चोरटा गुन्हे केल्यानंतर मोटारीतून कर्नाटकात पसार व्हायचा, अशी माहिती तपासात मिळाली होती.

वारजे भागात एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी नुकतेच पकडले. खडकी बाजार परिसरात एटीएममधून निवृत्तिवेतन काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठाच्या खात्यातून एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. अशा घटनांत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ही चोरीही अभिनव पद्धतीने होते. ‘एटीएम’च्या ज्या भागातून पैसे बाहेर (कॅश डिस्पेन्सर) पडतात, त्या भागात लोखंडी पट्टी ठेवली जाते. चोरटे ‘एटीएम’च्या बाहेर पाळत ठेवतात. व्यवहार केल्यानंतर पैसे पट्टीमुळे आतच अडकतात. मात्र, व्यवहार पूर्ण झाला नाही किंवा तांत्रिक अडचण आल्याची शक्यता गृहीत धरून नागरिक ‘एटीएम’मधून बाहेर पडतात. अशा वेळी ‘एटीएम’च्या बाहेर पाळत ठेवणारे चोरटे लगेच आत शिरतात. पट्टी सरकावून अडकलेले पैसे चोरून चोरटे पसार होतात.उत्तर प्रदेशातील टोळ्या अशा गुन्ह्यांत तरबेज आहेत. ते पुण्यात येऊन गुन्हे करून पुन्हा उत्तर प्रदेशात पसार होतात, असे निरीक्षण पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. चोरटे परप्रांतीय असल्याने त्यांचा माग काढणे शक्य होत नाही. सीसीटीव्ही चित्रीकरण मिळाल्यानंतर चोरटे सापडण्याची शक्यता खूप कमी असते. चोरटे शहरातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचणे जवळपास अशक्य असते.

शहरातील बहुतांश एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी बँकांच्या ‘एटीएम’च्या परिसरात सुरक्षारक्षक ठेवले जायचे. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर ‘एटीएम’च्या बाहेर तैनात असलेले सुरक्षारक्षक कमी करण्याचा निर्णय विविध बँकांच्या व्यवस्थापनांनी घेतला. सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून चोरटे ज्येष्ठ नागरिकांकडे मदतीचा बहाणा करून त्यांच्याकडील रोकड लांबवून पसार होतात. बरेच ज्येष्ठ नागरिक तंत्रस्नेही नसतात. वयोमानामुळे दृष्टीही क्षीण झालेली असते.

‘एटीएम’मध्ये पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांवर पाळत ठेवूनही चोरटे त्यांची फसवणूक करतात. त्यामुळे ज्येष्ठांनी ‘एटीएम’च्या परिसरात घुटमळणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर नजर ठेवावी.शक्यतो त्रयस्थ व्यक्तीच्या मदतीच्या भानगडीत न पडणे बरे. बतावणी करणारा चोरटा ‘एटीएम’च्या परिसरात आढळून आल्यास पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, जेणेकरून फसवणुकीचे गुन्हे राेखता येतील. शहरात बतावणी करणाऱ्या चोरट्यांच्या सुळसुळाट झाला आहे. पोलीस असल्याची बतावणी करून किंवा ज्येष्ठांना मदत करण्याच्या बहाण्याने चोरटे भर दिवसा फसवणूक करतात. अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी आता ज्येष्ठांनी सजग आणि सतर्क होण्याची गरज आहे. सजगता दाखविल्यास फसवणूक होणार नाही, तसेच चोरट्यांना पकडणे शक्य होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rahul.khaladkar@expressindia.com