‘प्रशासकीय अधिकाऱ्यांना सामान्यांचे प्रश्न क्षुल्लक वाटतात, पण खालच्या पातळीवर प्रश्न सुटला नसल्यानेच नागरिकांना अधिकाऱ्यापर्यंत यावे लागलेले असते हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे. अशा वेळी अधिकाऱ्यांनी ‘बी गूड- डू गूड’ हे तत्त्व पाळावे,’ असे मत राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले.
अक्षरधारा बुक गॅलरी आणि परचुरे प्रकाशनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सत्यनारायण यांच्या ‘आयुष्य जगताना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशनानंतर भाऊ मराठे यांनी त्यांची मुलाखत घेतली. अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश राठिवडेकर या वेळी उपस्थित होते.  
सत्यनारायण यांनी सनदी अधिकारी बनण्यापूर्वीचे व नंतर वेगवेगळ्या खात्यात काम करताना आलेले अनुभव सांगितले तसेच काही कविताही सादर केल्या. त्या म्हणाल्या, ‘‘माझे वडील पोलीस खात्यात होते. त्यांच्या इच्छेखातर मी प्रशासकीय सेवेत येण्यासाठी तयारी करू लागले. घरातून मला उत्तम प्रोत्साहन मिळत होते, पण बाहेर मात्र माझ्या सनदी अधिकारी बनण्याच्या निर्णयाचे खच्चीकरण करण्याचाही प्रयत्न काहींनी केला.’’ ‘चंगळवादाकडे चाललेली सामाजिक विकृती महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या मागे आहे. आजच्या वातावरणात स्त्रियांनी केवळ हुशार नाही, तर शहाणे होण्याची गरज आहे,’ असेही त्या म्हणाल्या.