आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना गुरुवारी सकाळी दोन नगरसेवकांनी मारहाण करीत तोंडाला काळे फासल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात दोन नगरसेवकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या औंधकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी आळंदीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राहुल चिताळकर पाटील व नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे यांच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिताळकर व कुऱ्हाडे यांना अनधिकृत बांधकाम व फलकाच्या विरोधात औंधकर यांनी नोटीस बजावली होती. इंद्रायणी नदीवरील पुलाजवळ सुरू असलेले अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी औंधकर हे सकाळी अकराच्या सुमारास गेले होते. त्यावेळी त्यांना या दोघांनी मारहाण करीत तोंडाला काळे फासले. तसेच, त्यांच्यावर चाकूने देखील वार केले. औंधकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. चिताळकर व कुऱ्हाडे यांना अनधिकृत बांधकाम व फलकासाठी नोटीस बजावल्याच्या रागातून हा हल्ला केल्याचा आरोप औंधकर यांनी केला आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.