प्राची आमले

प्रत्येक व्यक्ती ही समाजाचे काहीतरी देणे लागते या सामाजिक भावनेतून ग्रामीण, आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या ‘बिइंग व्हॉलिंटियर’ या संस्थेविषयी..

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर अशा समाजमाध्यमांनी आपल्या दैनंदिन जगण्यात आमूलाग्र म्हणता येईल अशी मोलाची भर घातली आहे. आपल्या जगण्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टींशी समाजमाध्यमांनी स्वतला जोडून घेतलेलं पहायला मिळते. समाजमाध्यमांचा असाच आगळावेगळा पण परिणामकारक वापर ‘बिइंग व्हॉलिंटियर’ या संस्थेनं करण्यास सुरवात केली आहे. ग्रामीण, आदिवासी भागात राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने शिक्षण घ्यावे, आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचेही शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संस्था काम करत आहे. गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करत स्वयंसेवकांची एक टीम उभी केली असून या टीमच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम राबविले जात आहेत. संस्थेची स्थापना २०१५ मध्ये झाली असून आतापर्यंत ३००० स्वयंसेवक राज्यभरातून संस्थेला जोडले गेले आहेत.

संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी अध्यक्ष कैलास नरावडे म्हणाले, आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी रद्दी संकलनाचा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत दर महिन्याला सोसायटी, कंपन्यांमधील रद्दी संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत गोळा केली जाते आणि ती फेरवापरासाठी दिली जाते. दर महिन्याला सध्या साधारण दोन हजार किलो रद्दी जमा होते. गेल्या वर्षी रद्दी संकलनातून १ लाख ७१ हजार दोनशे चोपन्न रुपये जमा झाले. जमा झालेल्या रद्दीच्या रकमेतून १९ विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण गेल्या वर्षी पूर्ण झाले. फक्त रद्दी संकलन नव्हे तर समाजासाठी काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.  संस्थेमार्फत अनेक पर्यावरणविषयक, स्वच्छतेविषयी जनजागृती व शैक्षणिक उपक्रम या तीन क्षेत्रांत विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये व्हॉलिंटियर एंगेज्मेंट, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी मेन्टर अ चाईल्ड, पर्यावरण संवर्धनासाठी सार्वजनिक ठिकाणी टेकडी, रस्त्याच्या बाजूला लावलेल्या झाडांची काळजी घेणे, त्यांना खत घालणे, ग्रामीण आदिवासी भागातील २०० मुलांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करणे, दर महिन्याला ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता, लोकांमध्ये पर्यावरण जनजागृती, गणेशोत्सवामध्ये निर्माल्य गोळा करणे यांसारखे विविध उपक्रम राबविले जातात.

संस्थेला स्वयंसेवक जोडण्यामध्ये समाजमाध्यमांचा मोठा वाटा असून या विषयी नरावडे म्हणाले, संस्थेच्या कामात समाजमाध्यमांनी मोठी भूमिका बजावली आहे. कोणत्याही नवीन उपक्रमाची माहिती देणे, ठरवून दिलेल्या भागातून रद्दी गोळा करणे अशी कामे करताना समन्वय साधण्यासाठी मदत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतील, कंपनी, सोसायटय़ांमधील अनेक स्वयंसेवक जोडले गेले आहेत. फक्त व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून दोन अंध मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी १ लाख ३३ हजार रुपयांची मदत झाली असून लोकांपर्यंत पोहोचण्याचे समाजमाध्यम हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. संस्थेचे ‘बिइंग व्हॉलिंटियर’ नावाचे संकेतस्थळ, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम आहे.

संकेतस्थळाच्या माध्यमातून देखील स्वयंसेवक  होता येते. संस्थेमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी व मदतीसाठी ९७६३९७६३७१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.