मिठाया आकर्षक दिसाव्यात यासाठी मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या चांदीच्या वर्खाच्या दर्जावर आता नव्याने काही बंधने येणार आहेत.पदार्थावर लावण्यासाठीच्या या वर्खाचे वजन प्रति चौरस मीटर किती असावे हे निश्चित करण्याचे ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ने (एफएसएसएआय) ठरवले असून वर्खाच्या निर्मिती प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर प्राणिजन्य पदार्थाचा वापर होऊ नये, असेही म्हटले आहे.
‘एफएसएसएआय’ने चांदीच्या वर्खाच्या दर्जाबाबत शुक्रवारी सुचवलेल्या या नियमांवर २१ मार्चपर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत. सध्या चांदीच्या वर्खातील चांदीची शुद्धता किमान ‘९९९/१०००’ इतकी असावी, तसेच वर्खाची जाडी एकसारखी असावी, त्यावर सुरकुत्या नसाव्यात, हे नियम अस्तित्वात आहेत. नव्याने सुचवलेल्या नियमांमध्ये वर्खाचे वजन प्रति चौरस मीटर २.८ ग्रॅमपर्यंत असावे व त्याच्या उत्पादनात कोणत्याही प्राणिजन्य पदार्थाचा वापर केला जाऊ नये,असे प्राधिकरणाने म्हटले आहे.
खाण्याचा चांदीचा वर्ख बनवताना त्याची जाडी अधिकाधिक पातळ करता यावी यासाठी तो प्राण्यांच्या चरबीच्या वा चामडय़ाच्या मध्ये ठेवून ठोकला जातो, असा एक प्रवाद ८ ते १० वर्षांपूर्वी निर्माण झाला होता व देशपातळीवर या मुद्दय़ाची चर्चा झाली होती, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत अन्न विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांना विचारले असता ते म्हणाले,‘ही बाब ऐकिवात आहे, परंतु राज्यात अद्याप तसे आढळलेले नाही. चांदीच्या वर्खात चांदीचे प्रमाण कमी आढळणे, तसेच चांदीच्या वर्खाऐवजी स्वस्त व पातळ अॅल्युमिनियम फॉईल वर्खासारखी वापरणे, दिसून आले आहे. ’
पुण्यात २०१४-१५ मध्ये चांदीच्या वर्खाचे १० नमुने एफडीएने गोळा केले होते, तर २०१५-१६ मध्ये २ नमुने घेण्यात आले. या एकूण नमुन्यांपैकी ४ नमुने कमी दर्जाचे आढळून आले.