दर वर्षी २६ ऑगस्ट हा दिवस ‘महिला समानता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. महिलांना समान संधी, मानसन्मान, लिंगभेद न करता वेतन आदी कारणे यामागे आहेत. या निमित्ताने महिला आणि बालकल्याणासाठी झटणाऱ्या १९७९ मध्ये स्थापित झालेल्या आणि ४७ वर्षं पूर्ण केलेल्या ‘भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे’ या संस्थेच्या माजी अध्यक्ष प्रतिमा जोशी यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
आपली संस्था कोणत्या प्रकारचे कार्य करते?
सुरुवातीला लीला शिंत्रे यांनी सांगली येथे ही संस्था सुरू केली. पाळणाघर, दाई-आया-हेल्पर-नर्सिंग अशी प्रशिक्षणे देण्यास प्रारंभ केला होता. प्रथमपासून सामान्य महिलेला सक्षम बनविण्याच्या दृष्टीने संस्थेने विविध उपक्रमांची आखणी केली. अर्ध अथवा बहुशिक्षित, गृहिणी, करिअरिस्ट अशा सर्वच प्रकारच्या महिलांसाठी संस्था कार्यरत आहे. महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी आणि समर्पित महिलांच्या गटाद्वारे संस्था कार्य करते. सर्वांत आधी महिलेच्या समस्या समजून घेणे, त्यांना स्वतःच्या मार्गाने प्रगती करण्यासाठी मदत करणे, त्यांच्या कुटुंबाचे जीवन समृद्ध करण्यासाठी, त्यांना चांगल्या संधी मिळवून देण्यास तयार करणे, हे आमचे ध्येय आहे.
दर वर्षी बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्याबरोबर त्यांना नि:शुल्क करिअर मार्गदर्शन करण्यात येते. डाॅक्टरेट करणाऱ्या विद्यार्थिनींनाही शिष्यवृत्ती देण्यासह महिलांना नवीन तंत्रज्ञान आणि ज्ञानाबद्दल माहिती दिली जाते. इलेक्ट्रिक असेंब्ली, ब्यूटी पार्लर, इंग्रजी संभाषण, वाहन चालवणे, कार्यालयीन सहायक असे विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि यशस्वी उद्योगासाठी मार्गदर्शनाच्या सुविधा संस्थेमार्फत दिल्या जातात. या सगळ्यांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होण्यास मदत होते. तसेच, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासही त्यामुळे मदत होऊ शकते, त्या आत्मनिर्भर बनतात. महिला साहाय्यता निधीही संस्थेमार्फत दिला जातो. संस्थेच्या दिघी येथील सुसज्ज, सुरक्षित आणि स्वच्छ परिसरातील वसतिगृहात शिक्षण आणि नोकरीनिमित्त बाहेर गावाहून पुण्यात येणाऱ्या महिलांची निवासाची सोय करण्यात आली आहे.
कुटुंबासाठी, मुलांसाठी काय-काय करता?
महिलांबरोबरच संपूर्ण कुटुंबीयांसाठी आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात. मुलांना स्वयंअध्ययन पद्धती अवलंबण्यास मदत केली जाते. शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी, त्यांना शिकण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि त्यांच्यात स्वयंअध्ययनाची सवय रुजवण्यासाठी ‘अभ्यासिका’ चालवली जाते. भाषा खेळ, गणिती कोडी, क्षेत्रभेटी, छंद कार्यशाळा, विज्ञान प्रयोग इत्यादी विविध उपक्रम मुलांसाठी आम्ही राबवतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पुरस्कृत केलेले आनंददायी आणि कृतिशील शिक्षण पुण्यातील आणि दिघीतील काही शाळांमध्ये दिले जाते. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून दर शनिवारी ग्रंथालय चालवले जाते.
वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांना आमंत्रित करून वैदिक गणित, योगासने यांचीही माहिती दिली जाते. तेथे मुलांच्या बुद्धीला चालना देणारे आणि एकाग्रता वाढविण्यासाठी बुद्धिबळ, कॅरम यांसारखे खेळ मुलांना शिकवले जातात. मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. मुलांसाठी ‘वाचा दोष सुधार केंद्र’ चालवले जाते. मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा म्हणून दिघीत सुसज्ज प्रयोगशाळादेखील आहे. पुण्यातील काही शाळांमध्ये स्वयंसेवकांच्या माध्यमातून प्रयोगसाहित्य शाळांमध्ये घेऊन जाऊन मुलांकडून प्रयोग करून घेतात. महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी दिघी येथे ३२ वर्षे संगणक प्रशिक्षण वर्ग चालविले जातात.
संस्थेचा किशोरवयीन प्रकल्प, युवा विकास कार्यक्रम काय आहे?
किशोरावस्थेच्या संक्रमण काळात होणाऱ्या शारीरिक, मानसिक बदलांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी ‘उमलत्या कळ्या’ हा उपक्रम पुण्यात तसेच दिघी येथे चालविला जातो. त्याद्वारे त्यांना समुपदेशनही केले जाते. शाळांमधील सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी हा किशोरवयीन प्रकल्प राबवला जातो. शाळांच्या मागणीनुसार पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्श’ ज्ञानावर आधारित चर्चासत्रे घेतली जातात. तसेच, पालकांचे समुपदेशन तितकेच महत्त्वाचे वाटल्याने सर्व शाळांमध्ये पालकसभा घेण्यात येतात. विद्यार्थ्यांबरोबरच महिलांना स्वसंरक्षणासाठी तज्ज्ञ शिक्षकांकडून कराटे प्रशिक्षण देण्यात येते. अशा प्रकारे एकंदरीतच महिलांसह संपूर्ण कुटुंबासाठी संस्था कार्यरत आहे.
shriram.oak@expressindia.com
