पुणे : जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याने गृहविभागाकडे दिलेल्या तक्रार अर्जावरुन पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील तत्कालिन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गृहविभागाच्या आदेशाने उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याविरुद्ध पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. झंवर याच्या जळगावमधील मालमत्तेवर आर्थिक गु्न्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली होती.
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बीएचआर पतसंस्थेविरुद्ध राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल झाले होते. पुण्यातील डेक्कन पोलीस ठाणे, तसेच ग्रामीण पोलीस दलातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पुण्यातील गु्न्ह्याचा तपास आर्थिक गु्न्हे शाखेकडून करण्यात येत होता. पतसंस्थेकडून स्वस्तात मालमत्ता विकत घेणे, तसेच कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी जळगावमधून सुनील झंवरला अटक करण्यात आली होती. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्या जळगावमधील मालमत्तेवर छापा टाकला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या तत्कालिन पोलीस उपायु्कत भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांच्या पथकाने जळगावत दहा ठिकाणी छापे टाकले होते.
हेही वाचा…पुणे : वैमनस्यातून सराइतांकडून तरुणावर तलवारीने वार, खडकी परिसरातील घटना
छाप्याच्या वेळी गैरप्रकार झाल्याचा आरोप झंवर याने केला होता. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जेवणाचे बील दुसऱ्या एका व्यक्तीने दिले होते. छाप्यासाठी खासगी गाड्यांचा वापर करण्यात आला होता, असा आरोप झंवरने गृहविभागाकडे दिलेल्या तक्रार अर्जात केला होता. राजकीय वैमनस्यातून मला गोवण्यात आले, असे तक्रार अर्जात त्याने म्हटले होते. झंवर माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर महाजन आणि खडसे यांनी एकमेकांवर आरोप केले होते.
झंवर पोलिसांविरुद्ध केलेली तक्रार काय ?
माझ्याविरुद्ध खोटा गु्न्हा दाखल करण्यात आला होता. माझ्या मुलाचा याप्रकरणाशी काही संबंध नव्हता. त्याला सहा महिने कोठडीत डांबून ठेवले होते. एका रात्रीत पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. सरकार दस्तऐवजाची (नस्ती) पाने बदलली. जळगावमधून मला अटक करण्यासाठी १३५ पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा पुण्याहून मागविण्यात आला होता, असा आरोप संशयित आरोपी सुनील झंवर याने गृहविभागाकडे दिलेल्या तक्रार अर्जात केला होता.
हेही वाचा…कौतुकास्पद : अर्ध्या तासात चार वर्षांच्या मुलीला शोधण्यात पोलिसांना यश
राजकीय वादात पोलीस अधिकाऱ्याचा बळी
सुनील झंवर याच्या तक्रारीनंतर पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत काही अधिकृत भाष्य केले नाही. राजकीय वैमनस्यातून पोलीस अधिकाऱ्यााचा बळी देण्यात आला, अशी चर्चा पोलीस दलात सुरू आहे.