पुणे : ‘संघ संपवण्याची भाषा करणारे स्वतः संपले. १९२५ मध्ये संघाचे कार्य सुरू झाले आणि १९२६ मध्ये साम्यवादी (कम्युनिस्ट) पक्षाचे काम सुरू झाले. आज १०० वर्षांनंतर साम्यवादी शोधूनही सापडणार नाहीत. तर, संघ एका शक्तीच्या रूपाने जागतिक मंचावर उभा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे संघाने नेहमीच सकारात्मक दृष्टी ठेवली. हिंदू चिंतनातून आलेली ही सकारात्मक दृष्टी जगभरात उभी करणे हेच संघाचे ध्येय आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी शनिवारी केले.

‘हिंदूंचे संघटन हे कोणाच्याही विरोधात नाही. हिंदू असण्याचा गौरव बाळगणे म्हणजे शांतता, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा समाज उभा करणे होय. जगाच्या कल्याणासाठी उभी राहिलेली हिंदूंची ही संघटित शक्ती संहारक नसून, नेहमीच संरक्षक भूमिका बजावणारी आहे,’ असे मतही त्यांनी मांडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात भैयाजी जोशी बोलत होते.

उच्च ऊर्जापदार्थ संशोधन प्रयोगशाळेचे (एचईएमआरएल) समूह संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. हिमांशू शेखर, वर्गाधिकारी दत्तात्रेय गर्गे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. नानासाहेब जाधव आणि कसबा भाग संघचालक ॲड. प्रशांत यादव या वेळी उपस्थित होते. जोशी म्हणाले, ‘संघाचे कार्य कोणाविरुद्ध नसून हिंदू समाजातील सकारात्मक ऊर्जा जागृत करण्यासाठी आहे.

सज्जनशक्ती संघटित करून समाज परिवर्तन घडवणे हाच संघाचा मूळ हेतू आहे. संघाबद्दलची उपेक्षा, उपहास आणि कौतुक करण्याचा काळ मागे पडला असून, समाज आता संघाशी खांद्याला खांदा लावून उभा आहे. समाजाला केवळ उपासना धर्मापुरते मर्यादित न ठेवता, आचरण आणि त्या माध्यमातून राष्ट्रधर्माकडे न्यायचे आहे. भारताच्या उत्थानातूनच जगाच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होणार आहे.’

डॉ. हिमांशू शेखर म्हणाले, ‘संघाच्या स्वयंसेवकांना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर भारताशी जोडण्याचे उत्तम कार्य संघ शिक्षा वर्गात केले जाते. भारताच्या सर्वांगीण विकासात स्वयंसेवकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल.’ अमोद कालगावकर यांनी प्रास्ताविकात वर्गाची माहिती दिली. या वर्गादरम्यान सेवाभाव जागृत करण्यासाठी श्रमसाधना, तसेच पर्यावरणाचे महत्त्व ओळखून वृक्षारोपण करण्यात आले. प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी कागदी पिशव्या बनवणे आणि कंपोस्ट खत तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. ॲड. प्रशांत यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू चिंताजनक

‘स्वातंत्र्यानंतर देशाने सर्वच क्षेत्रांत मोठी प्रगती केली असली, तरी अजूनही समाजातील दुर्गम आणि वंचित घटकांपर्यंत विकास पोहोचलेला नाही. आजही देशात कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण चिंतेचा विषय आहे. विकासाचे हे मोठे कार्य केवळ सरकार एकटे करू शकत नाही; त्यासाठी समाजाची संघटित शक्ती पुढे येणे गरजेचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमकी हीच जनशक्ती जागृत करण्याचे काम करत आहे,’ असे भैयाजी जोशी म्हणाले.