पुणे : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाला आवश्यक असलेले मनुष्यबळ हे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून उभे राहिले आहे. त्यामुळे १९४७ नंतर देशाच्या प्रगतीचा आणि विकासाचा आलेख जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आवश्यक असलेल्या क्षमतांनी युक्त मनुष्यबळ तयार करणारा ठरला आहे. कोणीही देशाला बळाच्या जोरावर दाबण्याचा प्रयत्न केला, तर ते यशस्वी ठरणार नाहीत, इतके सामर्थ्य गेल्या ७५ वर्षांत प्राप्त केले आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी मांडले.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या ‘ज्ञान मंडपम्’ या नवीन आणि आधुनिक शैक्षणिक वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमात जोशी बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजूषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, संस्थेचे ॲड. सदानंद फडके, उपाध्यक्ष गजेंद्र पवार, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष सुधीर काळकर, उपाध्यक्ष राधेश्याम अगरवाल या वेळी उपस्थित होते.
जोशी म्हणाले, ‘समाजाचे संचलन करण्यासाठी ज्ञान आणि बुद्धी या दोन्हींच्या बळावर उभे राहिलेले मनुष्यबळ निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याचे संतुलन बिघडते आहे का, असे वाटते. शिक्षण देतानाच व्यक्ती घडवणे गरजेचे आहे. अध्यापक, उपाध्याय, आचार्य, पंडित, दृष्टा आणि गुरू अशी आपली परंपरा आहे. देश विकसित होणे, देश सुरक्षित होणे अशा कल्पनांमध्ये अंतर आहे. अलीकडे संकुचित विचार, अहंकार, आत्मकेंद्री आणि असहिष्णू वृत्ती वाढत आहे. अशा काळात स्वातंत्र्य आणि त्याच्या सीमा हे दोन्ही समजून घेतले पाहिजे.
खरा माणूस होण्यासाठी भौतिक शिक्षणाबरोबरच मूल्य शिक्षण दिले पाहिजे. पण याचा विसर आज पडत आहे. भ्रष्टाचार करणारे अशिक्षित नाहीत, दहशतवादी कारवाया करणारे निरक्षर नाहीत, काळाबाजार करणारे बुद्धिमान आहेत. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील कमतरता भरून काढण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सरकार मिळून व्यापक शिक्षणावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
विकसित राष्ट्र होण्यासाठी संशोधनावर भर देण्याची गरज आहे. संशोधनातून एकस्व अधिकार, स्वामित्व धनातून व्यक्ती आणि देश संपन्न होतो. व्यवसायाभिमुख शिक्षणाबरोबरच मातृभाषेतून शिक्षण, संगीत आणि योग शिक्षण देणे गरजेचे आहे. यात विद्यार्थ्यांनी विविध भाषाही शिकल्या पाहिजेत, असे पाटील यांनी सांगितले.
एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची शिल्पकार राज्याची युवा पिढीच!
विकसित राष्ट्र होण्यासाठी तरुणांना मुख्य प्रवाहाशी जोडले पाहिजे. राज्यातील सव्वातीन कोटी युवा लोकसंख्या हे राज्याचे खरे बळ आहे. या तरुणांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल तेव्हाच डिजिटल आणि ग्लोबल महाराष्ट्र शक्य होईल. राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची शिल्पकार युवा पिढीच असणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रफितीद्वारे केलेल्या संदेशातून केले.
