पिंपरी : साडेपाच वर्षांपासून रखडलेल्या भामा आसखेड जलवाहिनीच्या कामाचा ठेकेदार बदल्यानंतर कामाला गती आली असून, जलवाहिनीचे काम ८० टक्के, तर जॅकवेलचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. या पाणीपुरवठा योजनेंतर्गत करण्यात येत असलेली कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने आंद्रा धरणातून शंभर आणि भामा आसखेड धरणातून १६८ असे २६७ दशलक्ष लिटर पाणी आणण्याचे नियोजन केले. भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी खेड, वाकी तर्फे वाडा येथील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून तळेगाव दाभाडे ‘एमआयडीसी’तील नवलाख उंब्रे ब्रेक प्रेशर टँकपर्यंत ७.३० किलोमीटर आणि तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी नेण्यासाठी १८.३० किलोमीटर अंतर १४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे नियाेजन केले.
हे काम १५ डिसेंबर २०२० रोजी एका ठेकेदाराला दिले. ते १४ डिसेंबर २०२४ पर्यंत संपणे अपेक्षित होते. परंतु, प्रशासनाने तीन वेळा दिलेल्या मुदतीतही काम केवळ ७० टक्केच झाले. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी या कामाचा ठेकेदार बदलून नवीन ठेकेदाराला काम देण्यात आले. त्यानंतर जलवाहिनीच्या कामाला गती आली.
आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेंतर्गत चालू असलेल्या भामा आसखेड धरण ते नवलाख उंबरे येथील बीपीटीपर्यंतच्या १७०० मिलिमीटर व्यासाची नलिका टाकणे, नवलाख उंबरे येथील बीपीटी ते देहूपर्यंत १४०० मिलिमीटर व्यासाची गुरुत्व नलिका टाकणे, तसेच भामा आसखेड धरण येथील जॅकवेल बांधणे या कामाची पाहणी केली. प्रत्यक्ष धरणाच्या पाण्याखालील शंभर फूट खोल बोगद्याचीही त्यांनी पाहणी केली. या सर्व कामांचा आढावा घेऊन उर्वरित कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी, कामाचे सल्लागार व ठेकेदार यांना सूचना दिल्या.
शहराची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन भामा आसखेड पाणीपुरवठा योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेतील सर्व कामांमध्ये गुणवत्ता आणि सुरक्षिततेची कोणतीही तडजोड न करता उर्वरित कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत, असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
१५ टक्के पाणीकपात कायम
जून महिना काेरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा वाढल्याने पिंपरी-चिंचवड शहरात १९ जूनपासून सुरू असलेली १५ टक्के पाणी कपात रद्द हाेण्याची अपेक्षा शहरवासीयांना हाेती. मात्र, धरण शंभर टक्के भरले नसून एल निनोचा प्रभाव कमी झाला नाही. त्यामुळे पाण्याचे आतापासूनच नियोजन करून काटकसरीने वापर करण्याची सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे. महापालिकेने १५ टक्के पाणी कपात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरपर्यंत धरणात शंभर टक्के पाणीसाठा असेल तरच १५ टक्के पाणी कपात रद्द केली जाईल. अन्यथा ही पाणी कपात पुढे कायम राहील, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
सव्वा सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा
समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने २५ नाेव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. ताे साडेसहा वर्षांनंतरही कायम आहे. अनियमित, अपुरे आणि कमी दाबाने पाणी येत असल्याची नागरिकांची सातत्याने ओरड सुरू आहे. भामा आसखेडचे पाणी येईपर्यंत एक दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
शहराची लोकसंख्या ३८ लाख, दिवसाला ६५० एमएलडी पाण्याची आवश्यकता
पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येला शुद्ध, सुरक्षित आणि अखंड पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने पवना धरण ते सेक्टर २३, निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पवना धरणातील पाणी प्रदूषणमुक्त व विश्वासार्ह पद्धतीने थेट जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सध्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३८ लाख असून दररोज सुमारे ६५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये पवना नदीतून ५२० एमएलडी, इंद्रायणी नदीतून १०० एमएलडी आणि एमआयडीसीमार्फत ३० एमएलडी पाणी उपलब्ध होते. सध्याची पाण्याची मागणी ६५५ एमएलडी असून मंजूर पाणी आरक्षण ७७६ एमएलडी आहे. लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता हे आरक्षण २०२९ पर्यंत पुरेसे राहील, असा अंदाज आहे. प्रस्तावित लोकसंख्या अंदाजानुसार २०३१ मध्ये ५५ लाख, २०४१ मध्ये ९५ लाख आणि २०५१ मध्ये १ कोटी ३५ लाख लोकसंख्या होण्याची शक्यता असून त्यानुसार अनुक्रमे ९४९ एमएलडी, १,६३८ एमएलडी आणि २,३२८ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासणार आहे.
