पिंपरी : भामा आसखेड पाणी योजनेच्या भूमिगत जलवाहिनीचे रखडलेले उर्वरित ३० टक्के काम करण्यासाठी दोन ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी ८५ कोटी ५९ लाख रुपये खर्च येणार असून काम पूर्ण करण्यास दहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर शहराला अतिरिक्त १६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. हे पाणी उपलब्ध होण्यासाठी आणखी वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. वाढीव पाणी उपलब्ध होईपर्यंत एक दिवसाआडच पाणीपुरवठा कायम राहणार आहे.
खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून शहरासाठी १६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी बंदिस्त जलवाहिनीद्वारे चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येणार आहे. चारवेळा मुदतवाढ आणि सूचना देऊनही संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही. हा प्रकल्प नोव्हेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, मुदतवाढ संपूनही अद्याप ३० टक्के काम शिल्लक आहे. त्यामुळे ठेकेदाराला बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर रखडलेल्या कामासाठी दहा एप्रिलला निविदा प्रसिद्ध करण्यात आली.
भामा आसखेड धरणापासून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टाकीपर्यंत १७०० मिलीमीटर व्यासाची भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे उर्वरित काम करण्यासाठी ३३ कोटी ३५ लाख रुपये खर्चाची निविदा होती. त्यासाठी पाच ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी तीन ठेकेदारांच्या निविदा पात्र ठरल्या. त्यातील ०.१ टक्के कमी दराची एका ठेकेदाराची निविदा स्वीकृत करण्यात आली. ते काम ३३ कोटी ३५ लाख ५४ हजार ८७७ रुपये दराने केले जाणार आहे. या कामाची मुदत नऊ महिने आहे.
ब्रेक प्रेशर टाकीपासून तळवडे व देहूपर्यंतच्या १४०० मिलिमीटर जलवाहिनीचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ५० कोटी ६९ लाख रुपये खर्चाची निविदा होती. त्यासाठी आलेल्या सहा पैकी दोन ठेकेदारांच्या निविदा पात्र झाल्या. त्यातील एका ठेकेदाराची तीन टक्के जादा दराची ५२ कोटी २३ लाख ५१ हजार १३३ रुपये खर्चाची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. या कामाची मुदत दहा महिने आहे. या दोन्ही कामांच्या ८५ कोटी ५९ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली आहे.
