पिंपरी : भंडारा डोंगरावर एकटीच फिरत असताना आढळून आलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीला तिच्याच आई-वडिलांनी डोंगरावर सोडून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कोणीतरी चांगली व्यक्ती आपल्या मुलीला घेऊन जाऊन तिचा सांभाळ करेल, या उद्देशाने आपल्या पोटच्या मुलीला डोंगरावर सोडल्याची कबुली आई-वडिलांनी दिली.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य मूळचे उत्तर प्रदेशातील असून, कामानिमित्त ते दीड महिन्यापूर्वी तळेगाव येथे आले होते. मुलीचे वडील एका कंपनीत कामाला असून, आई गृहिणी आहे. पगार तुटपुंजा असल्याने कुटुंब आर्थिक विवंचनेत आहे. त्यामुळे या दाम्पत्याने देहूजवळील भंडारा डोंगरावर रविवारी आपल्या मुलीला सोडले. ते तेथून निघून गेले. डोंगरावर मुलगी एकटीच आढळून आल्याने पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात पाठविले.
डॉक्टरांच्या तपासणीत तिच्या शरीरावर कोणतीही जखम अथवा ओरखडा नव्हता. मात्र, तिला मराठी किंवा हिंदी बोलता येत नव्हते. पोलीस ठाण्यातील एक महिला कर्मचारी या चिमुकलीची काळजी घेत होती. पोलिसांकडूनही डोंगर परिसरातील ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण तपासण्यात आले.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी संबंधित मुलीचे आई-वडीलच पोलीस ठाण्यात हजर झाले. आम्हाला ही मुलगी मुंबई येथे सापडली. तिला कोणीच नसल्याने आम्ही तिचा सांभाळ करत आहोत. मात्र, आता आर्थिक अडचणीमुळे या मुलीचा सांभाळ करणे शक्य नाही. म्हणून आम्ही तिला भंडारा डोंगरावर सोडले, अशी खोटी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी दरडावून विचारताच दाम्पत्य बोलते झाले. आमचीच मुलगी आहे. आम्हाला खूप आर्थिक अडचण आहे. मुलीचा सांभाळ करणे शक्य नाही. कोणीतरी चांगली व्यक्ती आपल्या मुलीला घेऊन जाऊन तिचा चांगला सांभाळ करेल, या उद्देशाने तिला डोंगरावर सोडले, अशी कबुली त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
