पुणे : दुर्मीळ हस्तलिखिते, प्राचीन पोथ्या, ऋग्वेदाच्या शारदा लिपीतील हस्तलिखित पोथीसह महाभारत, अथर्ववेद आणि भागवत ग्रंथाची प्रत, वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय उपकरणे, तीनशेहून अधिक प्रकाशनांसह ऑनलाईन अभ्यासक्रमांची सर्वांगीण माहिती असे ‘ज्ञानसागर’ शनिवारी खुले झाले. प्राच्यविद्या संशोधन क्षेत्रात कार्यरत भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या १०८ वर्षांच्या कार्याचे दर्शन घडताना अभ्यासकांसह तरुणाई अचंबित झाली.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या संग्रहातील महत्त्वाची हस्तलिखिते, ग्रंथ आणि मौल्यवान वस्तूंचा तसेच संशोधनप्रकल्पांचा समावेश असलेल्या ज्ञानसागर प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर मंजूषा नागपुरे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. खेलरत्न पुरस्कार विजेत्या ऑलिम्पिकपटू नेमबाज अंजली भागवत, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्मिता लेले, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, विश्वस्त प्रदीप रावत या वेळी उपस्थित होते. संस्थेच्या महाभारत-सांस्कृतिक सूची या संशोधन प्रकल्पातील ‘भीम’ या पुस्तकाचे तसेच प्राकृत-इंग्रजी कोशाच्या ११ व्या खंडाचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले. भांडारकर संस्थेत येत्या सोमवारपर्यंत (२३ फेब्रुवारी) हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
नागपुरे म्हणाल्या, ‘आपल्या देशाच्या जाज्वल्यपूर्ण अशा प्राचीन इतिहासाच्या दस्तऐवज, साहित्यांचे, स्मारकांचे संरक्षण आणि संवर्धन होण्याची मोठी गरज आहे, ज्यासाठी भांडारकरसारख्या संस्था वर्षानुवर्षे चिकाटीने काम करीत आहेत. अशा कार्याला सरकारबरोबरच समाजाच्या दातृत्वाची देखील गरज आहे. जुन्या गोष्टींचे महत्त्व लक्षात घेवून या क्षेत्रात अधिकाधिक संशोधन व्हायला हवे. संशोधक तयार होण्यासाठी अशा प्रकारच्या प्रदर्शनांची गरज आहे, ज्यातून या क्षेत्राकडे तरुणांना येण्याचे प्रोत्साहन मिळेल.’
भागवत म्हणाल्या, ‘संस्थेकडे असलेला प्राचीन साठा बहुमूल्य आहे, त्याचे सर्व समाजाला दर्शन व्हावे यासाठीचा हा ज्ञानसागर प्रदर्शनाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.’
फिरोदिया म्हणाले,“संशोधनाच्या क्षेत्रात गेली १०८ वर्षे कार्यरत असणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यात तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे. भारताचा अलौकिक असा प्राचीन इतिहास सर्वांनी अभ्यासला पाहिजे, यासाठीच भांडारकर संस्था चिकाटीने कार्य करीत आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने भांडारकर संस्थेचे कार्य सर्वसामान्यांना समजू शकेल”
संस्थेच्या नियामक परिषदेचे सदस्य व या प्रदर्शनाचे समन्वयक मनोज एरंडे यांनी स्वागत केले. संतोष रासकर यांनी आभार मानले. निबंधक श्रीनंद बापट यांनी सूत्रसंचालन केले.
