वर्ष १९७६. १ डिसेंबरच्या रात्री जक्कल-सुतार टोळीने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून ख्यातनाम संस्कृत पंडित काशिनाथशास्त्री अभ्यंकर आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य चौघांची हत्या केली. स्वयंपाकघरातलं जेवण टेबलावर मांडून रीतसर जेवण केलं. घरातली लूट घेऊन पसार होण्यापूर्वी अत्तराची फवारणी केली.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या समोर अभ्यंकर राहायचे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकातून सुरू होणारा भांडारकर रस्ता संपतो तिथे, डाव्या बाजूला हा स्मृती बंगला. जक्कलच्या टोळीच्या चोरी व खून सत्रामुळे घरांना दोन-दोन दरवाजे बसवून घेतल्याची, सायंकाळी सहा-सातनंतर खिडक्या-दरवाजे बंद करून बसल्याची आठवण परिसरातील ज्येष्ठ मंडळी अजूनही सांगतात.
‘स्मृती’ बंगल्याचा आता कायापालट झाला आहे. तिथे सुहृद मंडळाचे बधीर-मूक शिक्षण केंद्र आहे. पन्नास वर्षांहून अधिक काळ मूकबधीर विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे देण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. अक्षरओळख, मूलभूत शिक्षणाबरोबरच दुपारचा खाऊ आणि गरजूंना श्रवणयंत्रे, विशेष बस सेवा, स्पीच थेरपीसारखे उपचार या केंद्रात मोफत दिले जातात. त्याच्या थोडे पुढे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांची सदनिका असलेली इमारत. ‘मालती माधव’बाहेर पुलंच्या जन्मशताब्दी वर्षाची आठवण म्हणून महापालिकेने एक फलक लावलेला आहे. कमला नेहरू उद्यानाजवळच्या गल्लीत पंडित वसंतराव देशपांडे चौक आणि आणखी थोड्या अंतरावर हिराबाई बडोदेकरांचा बंगला. कथक गुरू रोहिणी भाटे, मनीषा साठे यांची घरेही याच परिसरात.
स्वातंत्र्यपूर्व काळातील दगडी बांधकाम, अंगण असलेले दिमाखदार बंगले ही या परिसराची ओळख. प्रत्येक बंगल्याची आपली एक खासियत. वेलींनी सजलेल्या बाल्कनी, चहूबाजूंनी सोडलेली मोकळी जागा आणि अंगणातल्या पर्जन्यवृक्षांची दाट सावली. बी. के. नाईक यांच्या चंद्र-कुंज बंगल्यात तर विहीर आहे. या विहिरीत पाणीही आहे.
महानगरातील रोजच्या घुसळणीत संस्कृती-परंपरा कशा टिकणार, असा सवाल वारंवार उपस्थित केला जातो. पण, शहराची संस्कृती लवचीकच असते. मूळ गाभा टिकवून, गरजेनुसार बदल पचवून परंपरा पुढे जात असतात. ‘परिसरातील महिलांचे गट रामायण-महाभारतातील कथांच्या वाचनासाठी आठवड्यातून एकदा एकत्र जमतात. त्यांच्या ऑनलाइन बैठकाही सुरू झालेल्या दिसतात. शहरात गाय-वासरू ठेवता येत नाही. पण, पुणेकरांना वसुबारसेच्या दिवशी गाय-वासराची पूजा करता यावी म्हणून माझी आजी लक्ष्मीबाई साने यांनी ही परंपराही सुरू केली. दिवाळीच्या पहिल्या दिवशी डेअरीच्या जवळ मोकळ्या पटांगणात मांडव टाकला जातो. तिथे गाय-वासराच्या दर्शनासाठी पुणेकर रांगा लावतात. सनई-चौघड्यांचे वादनाने संपूर्ण वातावरणात वेगळीच ऊर्जा असते,’ असे रत्ना साने-गोसावी सांगतात.
साने डेअरीच्या आवारात आजही त्या काळच्या पुण्याचा अनुभव घेता येतो. ‘इथे येणारे अनेकजण आश्चर्यचकित होऊन सगळा परिसर न्याहाळतात. पूर्वी एखाद-दोन गाड्या या रस्त्यावरून जायच्या. सगळ्या वस्तू जवळच. त्यामुळे काही आणायचे असले, की पायी जायचो. बाकी ठिकाणी बसने प्रवास. रिक्षाही लगेच मिळायची आणि पाहिजे तिथे पोहोचवायचीही. आता पीएमपीच्या दोनच बस या रस्त्याने जातात. रस्त्यावरची गर्दी आणि गाड्यांची संख्या आता किती तरी वाढली. डेअरीसमोरची चाळ जाऊन कमर्शिअल मार्केट आले. मात्र, रस्ता तसाच आहे,’ असेही रत्ना साने सांगतात.
डेअरीबरोबर वडिलांच्या जुन्या गॅरेजची आठवण करून देत गुणेश साने नव्याने विकसित होत असलेल्या बाजाराकडे लक्ष वेधतात. ते सांगतात, ‘या रस्त्यावर अनेक शिक्षण संस्था आहेत. प्रसिद्ध बाल शिक्षण मंदिर याच रस्त्यावर. अनेक व्यावसायिकांची कार्यालये असल्याने रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. ‘पीवायसी’ची भिंत आधी नव्हती, तेव्हा रस्त्यावरूनच मैदान दिसायचे. तिथे अनेक क्रिकेट सामनेही पाहिलेत. आता हा संपूर्ण परिसर नव्याने विकसित होत आहे.’
नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकातून पुढे पहिल्याच वळणावर पीवायसी हिंदू जिमखान्याची इमारत. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांना इंग्रजांच्या क्लबमध्ये प्रवेश नव्हता. पारशी लोकांचेही वेगळे क्लब होते. तेव्हापासून आजतागायत वेगवेगळ्या खेळांची मैदाने, गप्पा-सांस्कृतिक उपक्रमांसाठी पीवायसी हिंदू जिमखाना म्हणजे पुणेकरांच्या हक्काची जागा. रस्त्याच्या शेवटी, प्रसिद्ध प्राच्यविद्या पंडित रा. गो. भांडारकर यांच्या कार्याचे स्मरण म्हणून शेकडो अभ्यासक घडविणारे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर. दुर्मीळ ग्रंथसंपदेमुळे भांडारकर इन्स्टिट्यूट अभ्यासकांमध्ये लोकप्रिय. काळाबरोबर संस्थेने कात टाकली. आता ‘भांडारकर’मधली दुर्मीळ ग्रंथसंपदा डिजिटल माध्यमावरही उपलब्ध आहे.
भांडारकर रस्त्यावरून दुहेरी वाहतूक होत असली, तरी प्रभात रस्त्यावरून येणाऱ्या उपरस्त्यांची संख्या जास्त आहे. तुलनेने, आगरकर रस्ता आणि परिसरात जाण्यासाठी केवळ दोन-तीन मार्ग आहेत. त्यामुळे वळणांच्या ठिकाणी वाहनांची गर्दी नित्याचीच. आधीच अरुंद असलेल्या दुकानांसमोर लावलेल्या वाहनांमुळे रस्ता आणखी अरुंद होतो. भूमिगत वाहिन्या, गटारांच्या खोदकामांवेळी रस्त्यावरून दुचाकी जाईल एवढीच जागा उरते.
काहीही असले, तरी भांडारकर रस्त्यावरून फिरताना अजून तरी जुन्या पुण्याचा गंध येतो. पुनर्विकासाचा खटाटोप येथेही सुरू आहेच. काही बंगले, काही आठवणी त्या खटाटोपात काळाच्या पडद्याआड जातील. पण, पदपथांना अडथळा म्हणून झाडे अजून तरी पाडलेली नाहीत. झाडांच्या बुंध्यात मातीसाठी चारही बांजूंनी सोडलेली जागा आणि हिरवाईच्या पुढे एका चौकात मांडलेला पाण्याचा माठ पुण्यात सापडणे आता तसेही दुर्मीळच!
