अनंत अमुचि ध्येयासक्ती अनंत अन् आशा – स्वमग्न विद्यार्थी भरत चव्हाणचे सलग अडीचशे किलोमीटरचे सायकलिंग

भरत चव्हाण या १७ वर्षांच्या स्वमग्न विद्यार्थ्यांने कोल्हापूर ते पुणे हे २५० किलोमीटर अंतर विनाथांबा सायकिलग करून पूर्ण करीत आणखी एका जागतिक विक्रमाची नोंद केली.

भरत चव्हाण

दोन वर्षांपूर्वी सलग १३ तास पोहून जागतिक विक्रमाची नोंद करणाऱ्या भरत चव्हाण या १७ वर्षांच्या स्वमग्न विद्यार्थ्यांने कोल्हापूर ते पुणे हे २५० किलोमीटर अंतर विनाथांबा सायकिलग करून पूर्ण करीत आणखी एका जागतिक विक्रमाची नोंद केली. ‘अनंत अमुचि ध्येयासक्ती अनंत अन् आशा’ ही कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची काव्यपंक्ती सार्थ ठरविणाऱ्या भरतने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
बाल कल्याण संस्था ही विशेष मुलांचा सर्वागीण विकास साधणारी राज्यस्तरीय संस्था आहे. संस्थेद्वारे विविध उपक्रमांच्या माध्यमातून या विशेष मुलांमधील कला आणि क्रीडा कौशल्य समाजासमोर आणले जाते. दोन वर्षांपूर्वी २८ फेब्रुवारी रोजी संस्थेतील तीन स्वमग्न विद्यार्थ्यांनी सलग १३ तास पोहून जागतिक विक्रमाची नोंद केली होती. या विक्रमामध्ये सहभागी झालेल्या आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतलेल्या भरत चव्हाण याने आणखी एका जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. कोल्हापूर ते पुणे हे २५० किलोमीटरचे अंतर विनाथांबा सायकिलग करून पूर्ण करीत भरतने बाल कल्याण संस्थेला देदीप्यमान यश संपादन करून दिले.
गेल्या दीड वर्षांपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. भरत हा स्वमग्न विद्यार्थी असल्याने या उपक्रमासाठी संस्थेचे प्रशिक्षक नांगरे आणि तांबे यांनी त्याच्या पालकांशी संपर्क साधून त्याच्या अंगी असलेल्या शारीरिक क्षमतेबाबतची कल्पना दिली आणि भरतच्या सहभागाबद्दल पालकांची संमती प्राप्त केली. भरतच्या वडिलांनी फक्त संमतीच दिली नाही तर, त्याचा संपूर्ण सराव घेण्याची जबाबदारी स्वीकारली. दररोज सायकिलगचे अंतर वाढवत नेत अखेरच्या महिन्यात दररोज भरत आणि त्याचे वडील पहाटे चार वाजता सरावासाठी निघत. किमान १०० ते १२० किलोमीटर अंतर सायकिलग करून भरतची क्षमता वाढवत राहिले. विशेष म्हणजे दररोज भरतबरोबरच एवढे अंतर सायकल चालवून वडील भरतचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवत होते.
जागतिक विक्रमाची नोंद करण्यासाठी ३ फेब्रुवारी हा दिवस निश्चित करण्यात आला. संस्थेचे प्रशिक्षण, उपक्रमाचे निरीक्षण करण्यासाठी स्पेशल ऑलिम्पिक्स संस्थेने नेमलेले निरीक्षक राजू यादव, कैलास गायकवाड, विशाल दीक्षित, भरतचे वडील, नातेवाईक हे सारे २ तारखेला कोल्हापूरला रवाना झाले. कोल्हापूर येथील जिज्ञासा मतिमंद विद्यालयाच्या दीक्षित दांपत्याने बहुमोल सहकार्य केले. या सर्वाची निवास आणि भोजन व्यवस्था ही जबाबदारी हेल्पर्स ऑफ हँडीकॅप्ड संस्थेने स्वीकारून मोलाची मदत केली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पहाटे दोन वाजता महालक्ष्मी मंदिरासमोरून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. बाल कल्याण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी मीनिता पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला आणि जागतिक विक्रम करणाऱ्या भरतच्या सायकलचा प्रवास सुरू झाली.
कोल्हापूर ते पुणे हे अंतर विनाथांबा सायकिलग करताना भरतला सायकल पंक्चर होणे, दुपारच्या कडक उन्हाचा त्रास होणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत जाणे, आजूबाजूने जाणाऱ्या मोठय़ा वाहनांच्या धुराचा त्रास, रस्त्याची कामे असल्याने कच्च्या रस्त्याचा वापर करताना होणारी कसरत अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पुणे महापालिकेमध्ये सेवेत असलेले नितीन भोईटे यांनी भरतचे कौतुक करून त्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्याच्याबरोबरच संपूर्ण अंतर सायकिलग केले. रात्रीच्या बोचऱ्या थंडीवर मात करून रात्री सव्वाबारा वाजता भरतने पुण्याची शिव ओलांडून एका जागतिक विक्रमाची नोंद केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bharat chavan cycling

ताज्या बातम्या