पुणे : ‘भारत फोर्ज लिमिटेड’कडून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये सुमारे ८० एकर क्षेत्रात युद्धनौकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मरीन गॅस टर्बाइन (एमजीटी) इंजिनची दुरुस्ती, देखभाल आणि त्यासंबंधीचे स्वदेशी विकास संकुल उभारण्यात येणार आहे. देशात प्रथमच खासगी क्षेत्राकडून अशा केंद्राची उभारणी केली जाणार आहे. यासाठी भारत फोर्जने आंध्र प्रदेश सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे.
पुट्टपर्थी येथे आयोजित ‘एअरोस्पेस अँड डिफेन्स इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह’मध्ये ‘भारत फोर्ज लिमिटेड’चे अवकाश तंत्रज्ञान विभागाचे मुख्याधिकारी गुरू बिस्वाल यांनी नुकताच हा सामंजस्य करार केला. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू उपस्थित होते. या कार्यक्रमात भारताच्या एएमसीए पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान प्रकल्पाच्या पायाभरणीचाही सोहळा पार पडला. विशाखापट्टणममधील ‘आंध्र प्रदेश डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉरिडॉर’मध्ये ही सुविधा उभारण्यात येणार आहे. नौदल डॉकयार्ड, आयएनएस एक्सिला आणि ईशान्य नौदल मुख्यालय परिसरात ती असेल.
प्रथमच युद्धनौकांच्या अशा महत्त्वाच्या देखभाल क्षमतांचा समावेश भारताच्या खासगी क्षेत्रात होणार आहे. पहिल्या टप्प्यात संपूर्ण मरीन गॅस टर्बाइन दुरुस्ती आणि देखभाल संकुल उभारले जाणार आहे. यामध्ये हॉट सेक्शन पुनर्बांधणीचे काम, सुट्या भागांचे उत्पादन, प्रयोगशाळा आणि विशाखापट्टणम नौदल डॉकयार्डसाठी ७२ तासांच्या आत दुरुस्ती व सेवा पूर्ण करण्याची क्षमता या गोष्टी विकसित करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात भारतातील खासगी क्षेत्रातील पहिले मरीन गॅस टर्बाइन विकासाची सुविधा उभारली जाईल.
मित्र देशांनाही फायदा
या केंद्रात सर्व प्रकारच्या प्रोपल्शन क्षमतांसाठी विस्तार करता येईल, अशी अत्याधुनिक हॉट टेस्ट सुविधा तयार करण्यात येणार आहे. याचबरोबर भारतात प्रथमच स्वदेशी मरीन गॅस टर्बाइनचा विकास आणि पात्रतेच्या चाचण्या येथे केल्या जाणार आहेत. ही सुविधा मैत्रीपूर्ण देशांच्या नौदलांसाठी प्रादेशिक दुरुस्ती आणि देखभाल केंद्र म्हणूनही काम करणार असून, यामुळे येथे सुमारे ७५० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
पुरवठा साखळीतील अडथळ्यांवर मात
भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौकांच्या प्रोपल्शन व्यवस्थेचा मुख्य आधार गॅस टर्बाइन आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत या इंजिनांसाठीच्या परदेशी पुरवठा साखळीमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. त्याचा थेट परिणाम नौदलाच्या दुरुस्ती आणि देखभाल कामांवर तसेच कार्यक्षमतेवर झाला. भारत फोर्ज उभारत असलेली हे केंद्र त्यामुळे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.
