पुणे : ‘कान असून ऐकायचे नाही, डोळे असून बघायचे नाही आणि जीभ असून बोलायचे नाही, अशा परिस्थितीकडे आपली वाटचाल सुरू आहे. जातीचे भेद अनेक पटीने वाढले आहेत. वर्गाचा प्रश्न त्याहूनही मोठा झाला आहे. सामाजिक समतेच्या सगळ्या संस्था, संघटना आणि चळवळींचा आवाज दाबला जात आहे. देशात ‘फॅसिझम’ची परिस्थिती आहे. आता लेखणी हिरावून घेतली, तरीही स्वतःच्या रक्तामध्ये बोटे बुडवून लिहावे लागेल, अशी वेळ आली आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांनी यांनी व्यवस्थेवर टीकास्त्र सोडले. तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ‘मनुस्मृती’च्या विधानाचा समाचार घेत, नैसर्गिक साधनसंपत्ती भांडवलदारांच्या घशात घातली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
‘सामाजिक, आर्थिक विषमता दूर केल्याखेरीज वंचित-बहुजनांचा विकास होणार नाही. या प्रक्रियेत स्त्रियांनाही सामावून घ्यावे लागेल. त्यासाठी बंद पडलेली विषमता निर्मूलन शिबिरे परत सुरू करावी लागतील,’ अशी सादही पाटणकर यांनी घातली.
सामाजिक कृतज्ञता निधीच्या वतीने डॉ. पाटणकर यांच्या हस्ते सत्यशोधक बहुजन आघाडीला ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. संघटनेच्या वतीने सचिन बगाडे, बायडाबाई मुकणे यांनी पुरस्कार स्विकारला. शीला बाबा आढाव, निधीचे अध्यक्ष गजानन खातू, कार्याध्यक्ष सुभाष वारे आदी या वेळी उपस्थित होते.
पाटणकर म्हणाले,‘सुरुवातीला आपण दुष्काळातून मुक्त होण्यासाठी धरणे बांधली. त्याच धरणांमुळे विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी लढा द्यावा लागला. आता या धरणांचे पाणी अडाणी, अंबानी अशा उद्योगांना मोफत दिले जाऊन, आपले लाभक्षेत्र कमी करण्यात येत आहे. हवा, पाणी यापासून निर्माण केलेली वीज खासगी आहे. अशा प्रकारची सगळी नैसर्गिक साधनसंपत्ती उद्योगांना खुली करून देण्यात येत आहे. मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्प, धारावी आणि पुण्यातील झोपडपट्ट्या रिकाम्या करून प्रकल्पांच्या नावाखाली भांडवलदारांच्या घशात घातल्या जात आहेत. याचा मात्र कुणालाही थांगपत्ता नाही.’
‘महात्मा फुलेंनी जातिव्यवस्थेच्या निर्मितीवर, रचनेवर मूलभूत प्रश्न उपस्थित केले. समतेचा मार्ग दाखवला. आता जातिव्यवस्थेची मूळ प्रेरणा असलेली मनुस्मृती आदर्श ग्रंथ आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात तेव्हा बाबा आढाव आणि त्याआधी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या जातीअंत्याचे काय होणार, असा प्रश्न पडतो. स्त्री शूद्रादी शूद्रांनी एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका फुलेंना मांडली. याच भूमिकेने आपल्याला पुढे जावे लागेल,’ असेही त्यांनी नमूद केले.
‘आता त्याच प्रकाराच्या विषमता शिबिरांची गरज आहे का, याचा विचार करायला हवा. विषमतेचा नव्या पद्धतीने विचार करण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. गेल्या काही वर्षात समाजाचा पोत बदलला, प्रश्नांचे स्वरूप बदलले. आता नव्याने निर्माण झालेल्या प्रश्नांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी समकाळाला अनुसरून नवीन काहीतरी सुरू करुयात,’ असे आवाहन खातू यांनी केले.
वारे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल भोसले यांनी आभार मानले.
