पिंपरी : ‘राजकारणात काम करीत असताना पक्ष संघटना नेहमी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा मोठी असते. प्रत्येक कार्यकर्त्याने ही भावना मनाशी पक्की बाळगली पाहिजे. भारतीय जनता पक्षात संघटनेपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही,’ अशा शब्दांत भाजपचे शहर प्रभारी ॲड. भरत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

पिंपरी-चिंचवडच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर पाटील यांना संघटनेचा आढावा घेतला. आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस विकास डोळस,मधुकर बच्चे, वैशाली खाडये,युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, राजेश पिल्ले, राजू दुर्गे, दिनेश यादव यांसह सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व मोर्चे, आघाडी, सेल, प्रकोष्ठ आणि मंडल अध्यक्ष-सरचिटणीस आदी या वेळी उपस्थित होते. होते. या बैठकीत अ‍ॅड. भरत पाटील यांनी शहरातील पक्ष संघटनेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्ष बळकटीकरणावर विशेष भर दिला. याप्रसंगी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार गोरखे यांनी देखील उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

‘शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याबरोबरच सामान्यांतील सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्षाची ध्येयधोरणे घराघरांत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहोत. कार्यकर्त्यांचे कष्ट आणि जनतेचा विश्वास हीच आपली खरी ताकद असून, आगामी काळात पक्ष संघटना अधिक गतिमान करण्यावर आमचा भर असेल,’ असे शहराध्यक्ष काटे यांनी सांगितले.