दिवाळीनंतर १ डोस घेणाऱ्यांना प्रवासाची परवानगी देणार का? केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या…

राजेश टोपे यांनी दिवाळीनंतर १ डोस घेतणाऱ्यांना प्रवासाची परवानगी देण्याबाबत संकेत दिले. यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी उत्तर दिलंय.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिवाळीनंतर करोना विरोधी लसीचा एक डोस घेणाऱ्यांना देखील कुठेही प्रवासाची परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्याचे संकेत दिले. यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी उत्तर दिलंय. “लसीच्या डोसबाबत तज्ज्ञांची मते विचारात घ्यायला हवीत. तज्ज्ञांकडून तरी एक डोस घेतलेल्यांचा प्रवास, मॉल किंवा इतर ठिकाणी जाण्यास परवानगी देण्याची शिफारस नाही,” असं मत भारती पवार यांनी व्यक्त केलं. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

राज्य सरकारकडून दोन लसींमधील अंतर कमी करण्याची मागणी

भारती पवार म्हणाल्या, “लसीच्या डोसबाबत तज्ज्ञांची मते विचारात घ्यायला हवीत. तज्ज्ञांकडून अद्याप तरी एक डोस घेतलेल्यांना प्रवास, मॉल किंवा इतर कुठे जाण्यास परवानगी द्यावी अशा शिफारशी नाहीत. लसीच्या तुटवड्यावर हा पर्याय नाही. दोन लसींमधील अंतर कमी करण्याची राज्य सरकारने मागणी केली आहे, पण हा राजकीय विषय नाही. याबाबत ‘सायंटीफिक बेस्ड स्टडीज’ होऊन निर्णय होणं अपेक्षित आहे.”

“पुण्यात तिप्पट ऑक्सिजन प्लँट तयार, साडेसहा कोटी रुपयांची बिलं कमी केली”

“मी पुणे महापालिकेच्या खास भेटीसाठी आले आहे. करोना काळात महापालिका टीमने चांगले काम केले. त्यांनी कसं काम केलं आहे हे मला जाणून घ्यायचं होतं. केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईननुसार पालिकेनं काम केलं आहे. जवळपास तिप्पट ऑक्सिजन प्लँट तयार केले. हॉस्पिटलमध्ये बिल तक्रारी दूर करून साडेसहा कोटी रूपयांची बिलं कमी करण्यात आले आहेत. मात्र, त्या दरम्यान ८१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना मदत देखील करण्यात आली,” असंही भारती पवार यांनी नमूद केलं.

भारतात बुस्टर डोस देणार का?

भारती पवार म्हणाल्या, “तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता १ कोटी लसीकरण जिल्ह्याने पूर्ण केले आहे. तिसऱ्या लाटेवर लक्ष ठेवून आहे. रुग्णसंख्या वाढू नये यावर केंद्र लक्ष ठेवून आहे. २३ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. सध्यातरी पहिल्या आणि दुसर्‍या लसीच्या डोसबाबात गाईडलाईन्स आहेत. बुस्टर डोसबाबत नाही. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत आवश्यक बाबी लवकरच पूर्ण केल्या जातील.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bharati pawar comment on travel permission to one dose vaccinated people pbs

ताज्या बातम्या