पुणे : ‘मेणबत्ती बनवताना मेणाचे कण, कचऱ्याचा प्रश्न निर्माण व्हायचा. या कचऱ्याच्या पुनर्वापरातून काळी मेणबत्ती बनवली. सुरुवातीला या मेणबत्त्या विकल्या जात नव्हत्या. मात्र, काळ्या मेणबत्तीमुळे नकारात्मक उर्जेपासून दूर राहता येते, अशी जाहिरात केली आणि कचऱ्यापासून बनवलेली आमची काळी मेणबत्तीही मोठ्या प्रमाणात विकली जाऊ लागली,’ अशी माहिती सनराईज कॅनडल्सचे संस्थापक-उद्योजक भावेश भाटीया यांनी बुधवारी दिली.
‘लोकांना हवी असलेली गोष्ट आम्ही उपलब्ध करून दिली. मात्र, या काळ्या मेणबत्तीला शेतकरी, कामगार अशा सामान्य वर्गाकडून फारशी मागणी नव्हती. सुशिक्षितांना नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहण्याची अधिक गरज असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिकलेल्या, मोठ्या पदावर काम करणाऱ्यांकडून या मेणबत्तीची मागणी करण्यात येते,’ असेही त्यांनी नमूद केले.
मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आणि पीएम फाउंडेशनच्या वतीने ‘सामान्य ते असामान्य’ या उपक्रमांतर्गत नूतन कानेगावकर यांनी भावेश भाटिया यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. नीता भाटिया, मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, प्राचार्य किशोर निकम, पत्रकारिता विभागाचे प्रमुख संतोष शेणई, फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन गांधी या वेळी उपस्थित होते.
भाटिया म्हणाले, ‘मेणबत्ती बनवताना मोठ्या प्रमाणात कचरा उरायचा. हा कचरा वितळवून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात अनेक रंगांचे बारीक कण होते. ते एकत्र झाले आणि एक मळकट रंग तयार झाला. त्यात काळा रंग टाकून मेणबत्तीची निर्मिती केली. त्यानंतर १५-२० दिवसांनी केलेल्या सर्वेक्षणात एकही काळी मेणबत्ती विकली गेली नसल्याचे समोर आले. ग्राहक या मेणबत्तीला हात लावायलाही घाबरत होते. त्यामुळे हजारो दृष्टिहीन मित्रांचे पैसे अडकले.’
‘काही केंद्रांतून नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी काणते उत्पादन आहे का, असे ग्राहक विचारत होते. त्यांना ‘घराची, दुकानाची, ऑफिसची किंवा फॅक्टरीची नकारात्मक ऊर्जा घालवायची असेल, तर रोज एक काळी मेणबत्ती जाळा’ असा संदेश दिला आणि आमच्या काळ्या मेणबत्त्यांना मागणी वाढली. प्रतिष्ठित आणि मोठ्या भांडवलदारांकडून या मेणबत्तीला मोठी मागणी आहे. आता कचरा संपला; पण पांढऱ्या मेणबत्तीला काळे करून विकावे लागत आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.
पुढच्या प्रवासाबद्दल सांगताना भाटिया म्हणाले,‘जगातील सर्वात उंच १५० फूट मेणबत्ती बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच माउंट एव्हरेस्ट सर करणारा जगातील पहिला दृष्टिहीन बनायचे आहे. तिथून आईला सांगायचे आहे की, भले मी जगाला पाहू शकत नसेन, पण संपूर्ण जग मला पाहत आहे.’
‘अंपंगांसाठी दृष्टी बदलण्याची गरज’
‘आजही दीड कोटी दृष्टिहीन आणि इतर अपंग चार भिंतींमध्ये बंद आहेत. त्यांच्याकडे ओझे म्हणून नाही तर, साधन म्हणून बघायला हवे. त्यांची ऊर्जा देशाला खूप पुढे घेऊन जाईल. २०४७ पर्यंत विकसित भारत होण्याची वाट पाहावी लागणार नाही,’ असा विश्वास भावेश भाटीया यांनी व्यक्त केला.
भाटिया यांचा प्रेरणादायी प्रवास
वयाच्या २३ व्या वर्षी डोळ्यांशी संबंधित अंतर्गत समस्येमुळे दृष्टी गेलेल्या भावेश भाटिया यांनी मेणबत्तींचा कोट्यावधींची उलाढाल असलेला व्यवसाय उभारला. त्यांची उत्पादने केवळ देशातच नव्हे, तर जगातील अनेक देशांमध्ये खरेदी केली जातात. भाटिया यांची कंपनी सनराइज कँडल सध्या १० हजारहून अधिक मेणबत्त्या डिझाइन करते. त्यांनी हजारो अपंगांना रोजगार दिला आहे.
