Bhigwan Kidnapping Case Indapur Pune : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. अपहरण झाल्याची तक्रार दाखल असलेली तरुणी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाली आहे.
पोलीस दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने स्वतःच्या इच्छेने घरातून निघून गेल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. तसेच कोणत्याही प्रकारची जबरदस्ती अथवा अपहरण झाले नसल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. या जबाबानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहेत.
दरम्यान, युवतीच्या अपहरणाच्या घटनेचे भिगवणमध्ये संतप्त पडसाद उमटून बुधवारी भिगवण बंद ठेवण्यात आले. संतप्त नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. भिगवणमध्ये बुधवारी दिवसभर तणावपूर्व शांतता होती. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी भिगवणमध्ये मोठ्या पोलीस फौजफाट्यासह तळ ठोकला. ‘आरोपींना लवकरच अटक केली जाईल. नागरिकांनी शांतता राखावी,’ असे आवाहन त्यांनी केले.
पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण परिसरात कुटुंबीयांबरोबर खरेदीसाठी निघालेल्या २१ वर्षांच्या तरुणीच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून मंगळवारी तिचे अपहरण करण्यात आले. पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल केला. हे दोघे सख्खे भाऊ असून, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली परिसरात राहायला आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त नागरिकांनी, तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी भिगवण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. दिवसभर तणावाची परिस्थिती होती.

