पुणे : श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ विकसित करण्यात येणार आहे. मूळ गावापासून १५० मीटर अंतरावर सुमारे साडेदहा एकर क्षेत्रामध्ये ही ‘हेरिटेज वाडी’ असणार आहे. त्यामध्ये पारंपरिक वास्तुशैली आणि आधुनिक सुविधांचा समन्वय साधला जाणार आहे. या ‘हेरिटेज वाडी’मुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, भाविकांसाठी दर्जेदार सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
या हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पाहणी केली.
प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया, तसेच स्थानिकांसाठी प्रस्तावित सुविधांची याबाबतची माहिती त्यांनी घेतली. या वेळी आमदार दिलीप वळसे-पाटील, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘भीमाशंकर येथील ‘हेरिटेज वाडी’ पाहण्यासाठी पर्यटक येतील असे हे गाव होणार आहे. या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा, भाविकांसाठी दर्जेदार सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल. तसेच परिसराचे परिवर्तन घडून येईल.’
‘ग्रामस्थांनी या प्रकल्पासाठी सहकार्य केले आहे. या परिसरातील १५० घरांना अन्य ठिकाणी जागा देऊन चांगल्या गावाची रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविक मंदिरासोबत गावातही जातील आणि गावाची अर्थव्यवस्था बदलू शकेल. रस्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी विद्युत वाहन, दुकानांची रचना, बस स्थानक आदींचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधांमुळे भाविकांची संख्या वाढेल,’ असेही फडणवीस म्हणाले.
भीमाशंकरचे धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्व याचा विचार करून विकास आणि संवर्धन यांचा समतोल राखत प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
‘भीमाशंकर गावाचे नियोजित पुनर्वसन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि स्थानिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मूळ गावापासून १५० मीटर अंतरावर सुमारे साडेदहा एकर क्षेत्रात ‘हेरिटेज वाडी’ विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये पारंपरिक वास्तुशैली आणि आधुनिक सुविधांचा समन्वय साधण्यात येणार आहे,’ असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
‘स्थानिकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ४० हून अधिक व्यावसायिक युनिट्सची तरतूद करण्यात आली आहे. ‘विस्थापनाऐवजी पुनर्रचना’ या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प असून, ग्रामस्थांचे सामाजिक, सांस्कृतिक नाते अबाधित ठेवत जवळच्या परिसरातच पुनर्वसन करण्यात येणार आहे,’ असे डुडी यांनी स्पष्ट केलेे.
प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’मध्ये काय?
- प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’मध्ये वारसा प्रवेशद्वार, ग्रामपंचायत कार्यालय, सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र; तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.
- ‘लाइव्हलीहूड अपग्रेडेशन’ संकल्पनेंतर्गत नव्या वसाहतीचे नियोजन हे भाविक आणि पर्यटकांसाठी सेवा केंद्र म्हणून करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिकांना पर्यटनाशी संबंधित विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
- मंदिर परिसरातील रहिवाशांचे नियोजनबद्ध पुनर्वसन करण्यासाठी ‘झीरो फ्रिक्शन मॉडेल’चा अवलंब करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता आणि अन्य नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
