पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले तीर्थक्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या दर्शनासाठी प्रवेशिका (पास) घेण्याचा सक्तीचा निर्णय जिल्हा प्रशासनाने मागे घेतला आहे. त्यानुसार सकाळी ७ ते ११ या कालावधीत भाविकांना गुरुवारपासून (१८ जून) थेट दर्शन घेता येणार आहे. तसेच, ज्या भाविकांना तातडीने दर्शन घ्यायचे असेल, त्यांना पुढील सोमवारपासून (२२ जून) त्र्यंबकेश्वरच्या धर्तीवर अडीच हजार रुपयांमध्ये ‘तत्काळ दर्शन’ सुविधा दिली जाणार आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले तीर्थक्षेत्र भीमाशंकर मंदिर सोमवारपासून (१५ जून) भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर भाविकांसाठी खुले करताना सुरक्षा आणि विकासकामात अडथळा येऊ नये, यासाठी ऑनलाइन पासधारक भाविकांनाच दर्शन घेण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन प्रशासनाने आजपासून (गुरुवारी) सर्व भाविकांना कोणत्याही ऑनलाइन पास किंवा तिकिट बुकिंगशिवाय विनामूल्य दर्शन घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या संदर्भातील माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी दिली.
गुरूवारपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार असून, दुपारनंतर मंदिराचे काम होणार आहे. महिनाभरात भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन दुपारी एक वाजेपर्यंत दर्शनासाठी वेळ वाढविण्याचा प्रशासनाचा विचार आहे, असेही डुडी यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘रांगेत न थांबता वेगाने दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी प्रति भाविक २५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ही सेवा सोमवारपासून (२२ जून) सुरू होईल. त्यासाठी ‘श्री भीमाशंकर’ देवस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पैसे भरल्यानंतर ही सेवा उपलब्ध होईल. या सुविधेतून भीमाशंकर देवस्थान ट्रस्टकडे निधी जमा होऊन त्यातूनच मंदिराची देखभाल, दुरुस्ती आणि सुरू असलेल्या विकासकामांसाठी खर्च केला जाईल.’
दरम्यान, भीमाशंकर परिसराच्या सर्वांगीण विकासाचा भाग म्हणून ‘भीमाशंकर हेरिटेज वसाहती’च्या कामाची निविदा २५ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. जुलैअखेरपर्यंत या कामाचे कार्यादेश दिले जातील. हे संपूर्ण काम प्री-फॅब्रिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाणार असून अत्यंत जलद गतीने पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
‘यू-आकारात’ दर्शन मार्ग
गर्दीचे नियोजन आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने दर्शन मार्गात मोठा बदल केला आहे. यापूर्वी मंदिरात जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग एकच असल्याने मोठी गर्दी होऊन अपघात किंवा चेंगराचेंगरीची शक्यता होती. आता भाविकांना दर्शन घेतल्यानंतर ‘यू’ आकारात वळसा घेऊन थेट भीमाशंकर गावातून बाहेर पडावे लागणार आहे.
