पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथील भीमाशंकरवाडीचे नवीन जागेमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. नवीन ठिकाणी वर्षभरात घरे बांधून देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ग्रामस्थांना दिले.
श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आरखड्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. विकासकामांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. या मंदिरालगत असलेल्या भीमाशंकरवाडीतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डुडी यांची भेट घेतली. त्यामध्ये भीमाशंकरवाडीचे नवीन जागेमध्ये स्थलांतर करण्यास ग्रामस्थांनी संमत्ती दिली. तसेच, याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या वेळी भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवादे आदी उपस्थित होते.
‘भीमाशंकरवाडीमधील सर्व घरांचे स्थलांतर लगतच्या जागेमध्ये करण्यात यावे. विकासकामे पूर्ण झाल्यानंतरच ग्रामस्थांचे स्थलांतर करावे. बाधित होणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला दुकानासाठी गाळा उपब्लध करून द्यावा. गावठाणमधील सिटी सर्वे नोंदी वगळता अन्य ३० ते ४० घरे गावठाणाबाहेर असून, त्यांची ग्रामपंचायतला नोंद आहे. त्यामुळे या कुटुंबांनाही नवीन गावठाणामध्ये घरे देण्यात यावीत. घरांचे स्थलांतर करण्यापूर्वी नवीन जागेचा सिटी सर्वेक्षण करून त्याबाबतचा उतारा आणि घराचा ग्रामपंचायत उतारा उपलब्ध करून देण्यात यावा.
भीमाशंकरवाडी गावाचा स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, हा प्रस्ताव मंजूर करून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची निर्मिती करावी,’ आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या असून, याबाबतचे निवेदन देण्यात आले. या मुद्द्यांचा विचार करून भीमाशंकरवाडीचे नवीन गावामध्ये स्थलांतर करण्यास संमती असल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले, असून त्यावर सर्व ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
