पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले तीर्थक्षेत्र भीमाशंकर मंदिर सोमवारपासून (१५ जून) भाविकांसाठी खुले करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, मंदिरात प्रतिदिन एक हजार भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे.भाविकांनी दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या https://shreebhimashankar.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर प्रवेशिका (पास) उपलब्ध होणार आहे. नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर होणार असून, दर्शनाकरिता प्रवेशिका अनिवार्य करण्यात आल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
भाविकांना येत्या ३० जूनपर्यंत दररोज सकाळी ७ ते ११ पर्यंत दर्शन सुविधा उपलब्ध असेल. ऑनलाइन नोंदणी केलेल्या भाविकांना दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे. भाविक, तसेच स्थानिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सन २०२७ मधील नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि प्रयागराज महाकुंभ २०२५ च्या अनुभवाच्या आधारे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. संभाव्य गर्दीच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे नवीन सभामंडप आणि पायरी मार्गाचे काम सुरू असल्याने, ट्रस्टने ९ जानेवारीपासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या कामांना ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मुख्य मंदिरासमोरील सभामंडपाचे काम पूर्ण करण्यासाठी सामान्य परिस्थितीत सुमारे एक वर्षाचा कालावधी अपेक्षित होता. मात्र, त्यानंतर ही कामे करण्यास पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार कामे पूर्ण झाली असून, मंदिर खुले करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
