पुणे : ‘भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम (भीष्म आयकेएस) आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वतीने भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित ‘भीष्म फिल्म फेस्टिव्हल’ आणि त्याअंतर्गत रील्स बनविण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, पुण्यात २९, ३० आणि ३१ जानेवारी या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.
महोत्सवाचे संयोजक, प्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘भीष्म आयकेएस’चे प्रमुख प्रा. क्षितिज पाटुकले, प्राचार्य डॉ. श्याम मुडे, संस्थेचे सचिव आनंद काटीकर या वेळी उपस्थित होते.
भारद्वाज म्हणाले, ‘रील्सच्या स्पर्धेबरोबरच प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेविषयी चर्चा, व्याख्याने, प्रदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले असून, राष्ट्रीय पातळीवरील अनेक नामवंत विद्वान या महोत्सवात सहभागी होणार आहेत. तरुणांना दृकश्राव्य निर्मितीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.’
दरम्यान, रील्स स्पर्धेतील सहभाग आणि अधिक माहितीसाठी bff.bhishmaiks.org या संकेतस्थळावर संपर्क करण्याचे आवाहनही भारद्वाज यांनी केले.
आगरकर वक्तृत्व स्पर्धेत गोखले इन्स्टिट्यूटला विजेतेपद
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित गोपाळ गणेश आगरकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या ‘एशियन पार्लमेंटरी डिबेट’मध्ये ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’च्या संघाने विजेतेपद पटकावले. तर, मॉडर्न लॉ कॉलेजच्या संघाला उपविजेतेपद मिळाले.
या स्पर्धेत नेपाळ, श्रीलंका आणि दक्षिण कोरियातील संघांसह १२० संस्था सहभाग झाल्या होत्या. वादविवाद, एशियन पार्लमेंटरी डिबेट आणि मॉडेल युनायटेड नेशन्स अशा तीन प्रकारांत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वादविवाद स्पर्धेत चंडीगड विद्यापीठ आणि लखनौच्या संघाने विजेतेपद पटकावले, तर लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या संघाने उपविजेता आणि नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या संघाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. के. जैन यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. अशोक पलांडे, प्राचार्या डॉ. सुनीता आढाव या वेळी उपस्थित होते.
