पुणे : भोगीनिमित्त मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची रविवारी मोठी आवक झाली. हरभरा गड्डी, पावटा, घेवडा, वांगी, गाजर, बोरांच्या मागणीत वाढ झाली. घाऊक बाजारात हिरवी मिरची, कोबी, फ्लाॅवर, काकडी या फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली.
गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून १२५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशातून १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरची, राजस्थानातून १८ ते २० टेम्पो गाजर, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून २ ते ३ टेम्पो शेवगा, तामिळनाडूतून २ टेम्पो तोतापुरी कैरी, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, कर्नाटक, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो पावटा, मध्य प्रदेशातून ३५ टेम्पो मटार, तसेच मध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून ४०० गोणी सातारी आले, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, पावटा ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, नवीन आणि जुना कांदा मिळून १५० टेम्पो अशी आवक झाली, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो अशी आवक झाली.
हरभरा गड्डीच्या दरात वाढ
मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी हरभरा गड्डीची मोठी आवक झाली. मागणी वाढल्याने हरभरा गड्डीच्या दरात चार ते पाच रुपयांनी वाढ झाली. पुणे विभागातून २५ हजार हरभरा गड्डीची आवक झाली. कोथिंबिरीच्या एक लाख, तसेच मेथीच्या ७० हजार जुडींची आवक झाली.. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – १००० ते १५००, मेथी – ५०० ते ८००, शेपू – ५०० ते ८००, कांदापात – ५०० ते १०००, चाकवत – ४०० ते ८००, करडई- ३०० ते ७००, पुदिना – ३०० ते ६००, अंबाडी – ४०० ते ८००, मुळे – १००० ते १५००, राजगिरा – ५०० ते ८००, चुका- ५०० ते १०००, चवळई – ३०० ते ८००, पालक – १००० ते १५००, हरभरा गड्डी – ८०० ते १५००
