पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराचे संतप्त पडसाद राज्यात उमटले. अत्याचार, तसेच हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी जलद तपास करुन आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याच्याविरुद्ध भक्कम पुरावे संकलित केले. नसरापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी पंधरा दिवसात आरोपीविरुद्ध शनिवारी रात्री विशेष न्यायालयात ११०० पानी आरोपपत्र दाखल केले.
आरोपपत्रात ५० हून जास्त साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण, डीएनए चाचणी, वैद्यकीय, तसेच न्यायवैद्यकीय अहवाल जोडण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पुणे शहर, जिल्ह्यासह राज्यात संतप्त पडसाद उमटले. पोलिसांनी या प्रकरणात भोर तालुक्यातील भीमराव कांबळे (वय ६५) याला अटक केली. अत्याचार प्रकरणानंतर आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करुन संपप्त नागरिकांनी मुंबई -बेंगळररू बाह्यवळण मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवावा, असे आदेश दिले होते.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा अहोरात्र तपास करुन गुन्हा घडल्यानंतर पंधरा दिवसात शनिवारी रात्री आरोपपत्र दाखल केले. पोलीस अधीक्षक गिल यांनी स्वत: आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली. विशेष सरकारी वकील अजय मिसार, तपास अधिकारी विजयमाला पवार यांच्यासह अधिकारी या वेळी उपस्थित होते.
आरोपपत्रात काय ?
आरोपी भीमराव कांबळे याला घटनास्थळी नेण्यात आले. घटनाक्रमाचा पंचनामा, सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच तांत्रिक पुरावे संकलित करण्यात आले आहेत. आरोपपत्रात ५० हून जास्त साक्षीदारांचे जबाब नोंदवून जोडण्यात आले आहेत. अत्याचाराची घटना घडण्यापूर्वी आरोपीचा वावर घटनास्थळी होता. त्याला प्रत्यक्षदर्शींनी पाहिले होते. या परिसरात खेळणाऱ्या मुलांनी त्याला पाहिले होते. आरोपीने बालिकेला गोठ्याला नेले होते. तेथे खेळणाऱ्या मुलांनी त्याला पाहिले होते. या मुलांची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरणार आहे. शवविच्छेदन अहवालात बालिकेच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. शवविच्छेदन अहवाल, डीएनए अहवाल, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल, तसेच तांत्रिक पुरावे आरोपपत्रात जोडण्यात आले आहेत.
नसरापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करुन आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विशेष न्यायालयात या प्रकरणाची जलदगतीने सुनावणी घेण्यात येणार आहे.- संदीपसिंग गिल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
नसरापूर अत्यचाार प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी पंधरा दिवसात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे संकलित करण्यात आले आहेत. आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.- अजय मिसार, विशेष सरकारी वकील, नसरापूर अत्यचाार प्रकरण
