पुणे : भोर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीतही भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना नशिबाने साथ दिली नाही. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांकडे समान सदस्यसंख्या असल्याने चिठ्ठी काढून झालेल्या निवडीमध्ये ‘राष्ट्रवादी’च्या मनिषा कंक यांची सभापतिपदी निवड करण्यात आली. विशाल कोंडे यांची उपसभापती पदावर वर्णी लागली.
या पंचायत समितीत आठ सदस्यसंख्या आहे. भाजप आणि ‘राष्ट्रवादी’ या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी चार सदस्य निवडून आले. त्यामुळे चिठ्ठी काढून निवडणूक प्रक्रिया करण्यात आली. सभापतिपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. ‘राष्ट्रवादी’कडून तृप्ती खुटवड आणि मनीषा कंक या दोन उमेदवार होत्या. भाजपकडून गीता आंबवले आणि सुषमा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी कंक यांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. उपसभापतिपदी विशाल कोंडे हे निवडून आले.
माजी आमदार थोपटे यांच्यावर नामुष्की
माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यावर नामुष्की ओढवली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रस (अजित पवार) पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या भोर नगरपालिकेमध्येही आमदार थोपटे यांना अपयश आले. आता पंचायत समितीचे सभापतिपदही त्यांच्या हातातून गेले. त्यामुळे माजी आमदार थोपटे यांना हा राजकीय धक्का असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
माजी आमदार थोपटे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या भोर नगरपालिकेच्या निवडणुकीच्यानिमित्ताने थोपटे आणि मांडेकर हे दुसऱ्यांना समोरासमोर आले. मात्र, त्या निवडणुकीत नगरपालिकेच्या अध्यक्षपदी ‘राष्ट्रवादी’चा उमेदवार निवडून आला.
माजी आमदार थोपटे यांनी मुळशी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची साथ घेत सत्ता मिळण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी राजकीय हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, आमदार शंकर मांडेकर यांनी त्यांचा हा डाव उधळून लावला आहे.
दरम्यान, थोपटे यांची पत्नी स्वरूपा थोपटे या पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडून आल्या, एवढी एकच गोष्ट माजी आमदार थोपटे यांना समाधान देणारी झाली आहे.
