पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका ६५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पुणे सातारा महामार्गावर शुक्रवारी रात्री आंदोलन केले.
भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगार्याखाली पूरल्याचे उघडकीस आल्यानंतर संतप्त पडसाद उमटले. या भागातील नागरिकांनी पुणे सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर ग्रामस्थांनी राजगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान आरोपीला ताब्यात देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांची बाजू ऐकून आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, असे असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर नसरापूर परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पुणे ग्रामीण पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
