शहरातील पहिला चार मजली वाहनतळ उद्घाटनानंतरही सुरू न झाल्याने भाेसरी-आळंदी रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे सायंकाळच्या वेळेत प्रचंड कोंडी होत आहे.
भोसरीतील आळंदी रस्त्यावरील शहरातील पहिल्या चार मजली वाहनतळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन हाेऊन तब्बल ११ महिने झाले. मात्र, कै. श्री ज्ञानेश्वर सोपानराव गवळी वाहनतळ सुरू करण्यात महापालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. परिणामी, भाेसरी-आळंदी रस्त्यावर चालकांना सातत्याने वाहतूक काेंडीला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने सायंकाळच्या वेळेत प्रचंड कोंडी होत आहे.
भोसरीतील आळंदी रस्त्यावर मुख्य बाजारपेठ वसली आहे. या रस्त्यावरील पदपथावर व्यापाऱ्यांकडून विक्रीच्या विविध वस्तू ठेवल्या जातात. रस्त्यावर विविध विक्रेत्यांनी हातगाडी लावून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मुळातच अरुंद असलेल्या या रस्त्याची रुंदी आणखी कमी झाली आहे. पूर्वी महापालिका आणि भोसरी पोलीस वाहतूक विभागाद्वारे या रस्त्यावर सम-विषम वाहनतळाचे नियोजन केले होते. तसे फलकही महापालिकेने या रस्त्यावर लावले. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. ग्राहक आणि दुकानदारांनी दुकानासमोरील रस्त्यावर लावलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
वाहनांच्या पार्किंगची ही समस्या सोडविण्यासाठी कै. सखूबाई गवळी प्रवेशद्वारासमोरील जागेत महापालिकेने चार मजली वाहनतळ उभारला. या वाहनतळात दीडशे दुचाक्यांबरोबरच ७५ चारचाकी वाहने लावण्याची व्यवस्था आहे. महापालिकेच्या ‘ई’ प्रभाग स्थापत्य विभागाद्वारे या वाहनतळाचे काम डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जून २०२५ मध्ये वाहनतळाचे उद्घाटन झाले. मात्र, वाहनतळ अद्याप सुरू झालेला नाही. भाडेनिश्चितीचा प्रस्ताव महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागाद्वारे नगररचना विभागाकडे पाठविण्यात आला होता. पण, नगररचना विभागाकडून दरनिश्चितीला विलंब झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. उद्घाटनानंतरही वाहनतळ सुरू न झाल्याने तेथे बकाली वाढत आहे.
वाहनतळाची कचराकुंडी
उद्घाटनानंतरही वाहनतळ सुरू न झाल्याने वाहनतळाची दुरवस्था झाली आहे. वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचा खच पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे प्रवेशद्वाराची कचराकुंडी झाली आहे.
नगररचना विभागाकडून वाहनतळाच्या दाेन मजल्यांची दरनिश्चिती करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. मंजुरी मिळताच निविदा प्रसिद्ध करण्यात येईल, असे भूमी आणि जिंदगी विभागाचे उपायुक्त सीताराम बहुरे यांनी सांगितले. वाहनतळ सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत प्रशासनाशी चर्चा झाली आहे. लवकरात लवकर वाहनतळ सुरू करण्याची सूचना केली असल्याचे स्थानिक नगरसेवक सागर गवळी यांनी सांगितले.
