पिंपरी : एमआयडीसी भोसरी परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने कामाच्या पहिल्याच दिवशी चार अल्पवयीन मुलींना टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो असे आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. एका दहा वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे हा प्रकार उघडकीस आला असून, पाेलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
दिनेश चाैधरी (वय २६) असे अटक केलेल्या आराेपी सुरक्षारक्षकाचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने याबाबत तक्रार दिली आहे.भोसरी परिसरातील एका सोसायटीत शुक्रवारी दुपारी आरोपी चौधरी याने दहा, आठ आणि सहा वर्षे वयोगटातील चार मुलींना टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो असे आमिष दाखवून सातव्या मजल्यावर नेले. तिथे त्याने मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार कोणाला सांगितला तर मारून टाकेन, अशी धमकीही त्याने चिमुरड्यांना दिली. आरोपीच्या धमकीमुळे मुली घाबरल्या होत्या. मात्र, त्यातील दहा वर्षांच्या एका मुलीने न घाबरता घरी पोहोचताच आईला सर्व प्रकार सांगितला. पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेत आराेपीवर गुन्हा दाखल केला. सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी सांगितले.
.
