पुणे : बिबवेवाडी भागातील एका १६ वर्षीय युवतीचा विवाह केल्या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
महिला आणि बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष हेल्पलाइन (१०९८) सुरू करण्यात आली आहे.
बिबवेवाडी भागातील अल्पवयीन युवतीचा विवाह करुन देण्यात आल्याची माहिती हेल्पलाइनवर मिळाली. त्यानंतर पर्यवेक्षिका मोनिका जाधव आणि पथकाने भेट दिली. चौकशीत अल्पवयीन मुलीचा विवाह करुन देण्यात आल्याची माहिती मिळाली. मुलीचे वय निश्चित करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला तपासण्यात आला. तेव्हा ती अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले. अल्पवयीन युवतीचा जाणीवपूर्वक विवाह करुन देण्यात आल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील कलम ९, १० आणि ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी युवतीच्या नातेवाईकांची बाजू तपासली. त्यानंतर या प्रकरणात संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल माने तपास करत आहेत.
त्वरीत तक्रार करा
‘बालविवाहाचे प्रकार आढळून आल्यास त्वरीत विशेष हेल्पलाइन (१०९८) संपर्क साधावा’, असे आवाहन जिल्हा समन्वयक अली अख्तर अन्सार यांनी केले आहे. ‘माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे’, असे त्यांनी नमूद केले.
‘मकोका’ कारवाईनंतर फरार झालेला गुंड बीडमधून अटकेत
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बीड जिल्ह्यातून अटक केली. कारवाईनंतर सराईत गेेले वर्षभर पोलिसांना गुंगारा देत होता. प्रथम नितीन मोहिते (वय २१, सध्या रा. शिवाजीनगर गावठाण, मूळ रा. खडकपुरा पेठ, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
मोहिते याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी ‘मकोका’ कारवाई केली होती. कारवाई केल्यानंतर तो पसार झाला होता. मोहिते याने मारहाण, धमकी देणे अशा प्रकारचे गु्न्हे फरार झाल्यानंतर केले होते. माेहिते हा बीड जिल्ह्यात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला बीड परिसरातून अटक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश माळगावे, पोलीस कर्मचारी रणजीत फडतरे, अमोल आवाड, मयूर भोकरे आणि पथकाने ही कारवाई केली.
